बॉलिवूडमध्ये ‘मीटू मोहीम’ सुरु करण्याचं  श्रेय  अभिनेत्री तनुश्री दत्ताला दिलं जातं. कित्येक वर्षांनंतर भारतात परतलेल्या तनुश्रीनं आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून ‘मीटू मोहीमे’ला सुरूवात केली. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तिनं असभ्य वर्तणूकीचे आरोप केले त्यानंतर अनेक महिला पुढे आल्या आणि ग्लॅमरच्या दुनियेचं वास्तव समोर आणलं.

आता तनुश्रीला हार्वर्ड विद्यापीठाकडून खास आमंत्रण आलं आहे. या महिन्यात पार पडणाऱ्या हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय परिषदेत ती प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित राहणार आहे. तनुश्रीनं स्वत: याबद्दल माहिती दिली. तनुश्री या परिषदेत मी टु मोहीम, तिचा आतापर्यंतचा प्रवास, स्त्रीयांवर होणारे अत्याचार यांसारख्या विषयांवर बोलणार आहे. तनुश्रीनं स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात तनुश्रीनं नाना पाटेकर आणि कोरिओग्राफर गणेश आचार्यवर असभ्य वर्तणुकीचे आरोप केले होते. हे प्रकरण खूपच गाजलं होतं. तनुश्रीच्या आरोपानंतर तिला पाठिंबा देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकार पुढे आले. तनुश्रीपासून प्रेरणा घेत अनेक महिलांनी बॉलिवूडमध्ये बड्या दिग्दर्शकांचे खरे चेहरे समोर आणले. यात साजिद खान, आलोक नाथ, विकास बहल यांसारख्या अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांचा समावेश होता.