नुकताच आमिर खानने गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘मोगुल’ चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले. पहिले या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपनंतर आमिर खानने चित्रपटातून काढता पाय घेतला होता. परंतु सुभाष कपूर यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध न झाल्याने आमिर खानने पुन्हा चित्रपट करण्याचे ठरवले.
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषाणाचे आरोप करत तनुश्री दत्ताने बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेला सुरुवात केली होती. आता आमिर खानने पुन्हा ‘मोगुल’मध्ये सुभाष यांच्यासोबत काम करण्याचे सांगितल्यावर तनुश्रीने संताप व्यक्त केला आहे. ‘सुभाष कपूर यांच्यासह पुन्हा काम करण्यासाठी आमिरने केलेले ट्विट मी वाचले. ते वाचून मला एक प्रश्न पडला आहे. जेव्हा एखाद्या महिलेसोबत गैरवर्तणूक होते तेव्हा बॉलिवूडमधून कोणीच का आवाज उठवत नाही? गैरवर्तणूक करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा काम मिळू शकते तर त्या पिडित महिलेला पुन्हा काम का मिळत नाही?’ असे तनूश्री म्हणाली.
‘मी टू मोहिमेबद्दल अनेकांच्या मनात दयाभाव निर्माण झाला होता. परंतु पिडित महिलांबद्दल कोणालाच काही वाटले नाही. कुणी माझ्यावर झालेल्या गैरवर्तणूकीबद्दल मला विचारलेदेखील नाही’ असे तनुश्री पुढे म्हणाली.
आमिरने एका मुलाखतीदरम्यान ‘मोगुल’ चित्रपटाबद्दल वक्तव्य केले होते. ‘किरण आणि मी मोगुल चित्रपटाची निर्मिती करणार आहोत आणि या चित्रपटात मी अभिनय देखील करणार होतो. सुरुवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. माझ्या मते त्यांच्यावर लावण्यात आलेले हे आरोप ४-५ वर्षांपूर्वीचे आहेत. गेल्या वर्षी मी टू मोहिम सुरु झाली आणि त्यांच्यावरील आरोप सर्वांसमोर आले. त्यानंतर आम्ही दोघेही मानसिकदृष्ट्या अस्थिर झालो. मी आणि किरण एक आठवडाभर काय करावे याचा विचार करत होतो’ असे आमिर एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
त्यानंतर आमिरला पुन्हा ‘मोगुल’ चित्रपटासाठी दिलेल्या होकाराबद्दल विचारण्यात आले. ‘माझ्यामुळे एका व्यक्तीचे काम अडचणीत आले. त्यामुळे माझी झोप उडाली. मी आणि किरणने सुभाषसोबत गेली ५-६ वर्ष काम करणाऱ्या महिलांना भेटण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आम्हाला एक महिला अशीही भेटली जिने सुभाषबद्दल काहीच वाईट सांगितले नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याने कोणत्या महिलेसोबत गैरवर्तन केले नसेल. मला याबद्दल फार काही माहित नाही. त्यामुळे मी कोणाला दोषी ठरवू शकत नाही. त्यानंतर आम्ही फार विचार केला आणि IFTDA ला या बाबत विचार करत असल्याचे कळवले’ असे आमिर पुढे म्हणाला.