बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान लवकरच एक नवा शो घेऊन टेलिव्हिजवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘टेड टॉक्स’ असं या शोचं नाव असून त्याचा प्रोमोसुद्धा शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केला आहे. लॅपटॉपवर जेव्हा मुलं गेम खेळण्यात किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात, तेव्हा पालकांचा ओरडा बसणं स्वाभाविक असतो. अशा वेळी तो ओरडा टाळण्यासाठी किंग खान मुलांना एक पर्याय सुचवताना या प्रोमोमध्ये दिसतो.

‘स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा कंम्प्युटरवर दिवसभर गेम्स खेळत असतोस, चॅटिंग करतोस, व्हिडिओ बघत बसतोस असे पालक ओरडायला लागल्यास, त्यांना सांगा की आम्ही ‘टेड टॉक्स’सुद्धा बघतो,’ असं शाहरुख म्हणतो. या प्रोमोसोबतच त्याने प्रसारणाची वेळ आणि तारिखसुद्धा चाहत्यांना सांगितली. १० डिसेंबर म्हणजेच रविवारपासून संध्याकाळी सात वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे.

वाचा : एकत्र मिळून परिस्थितीचा सामना करू; ‘क्वीन’चा ‘राणी पद्मावती’ला पाठिंबा

‘टेड टॉक्स’ हा कार्यक्रम पाश्चिमात्य देशांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषेत पाहायला मिळतो. या कार्यक्रमात अनेक देशातील नामवंत आणि प्रतिभाशाली व्यक्ती प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या कार्यक्रमात येऊन ही मंडळी आपला अनुभव, आपली मतं मांडत असतात. आपल्या आयुष्यातील घटनांविषयी आपल्या चाहत्यांना सांगतात. आता हा कार्यक्रम भारतीय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे भारतीय व्हर्जन शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. भारतातीतल मनोरंजन क्षेत्रातील, तसेच विविध क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमात आपल्याला दिसणार आहेत.