गोरेगावच्या आरे वसाहतीतील नियोजित मेट्रो कारशेडसाठी शुक्रवारी रात्री हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली. या वृक्षतोडीचा तीव्र विरोध पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून होत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने गावदेवीच्या रुपात या वृक्षकत्तलीवर संताप व्यक्त केला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ देवींच्या रुपात तेजस्विनी मोलाचा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. अष्टमीनिमित्त तिने ‘गावदेवी’च्या रुपातील फोटो पोस्ट केला असून वृक्षांच्या कत्तलीचा मुद्दा त्यातून मांडला आहे.

वृक्षांच्या मुळावर घाव घालू नकोस, तर समस्येच्या मुळावर घाल असं म्हणत तिने माणसाच्या स्वार्थी वृत्तीचे वर्णन या पोस्टमध्ये केले आहे. ”इतके रस्ते, इतकी वाहनं असूनही तुला वेग कमीच वाटतोय का? तुझा प्रवास सुखकर आणि वेगाने होण्यासाठी तू आज यांचा प्रवास संपवतोयस? किती हतबल आहे मी.. या संपत्तीला कसे वाचवू? किती जीव वैविध्याने सजवली होती मी ही वसुंधरा.. यावर हक्क फक्त तुमचाच कधी झाला? जंगलं साफ करा वस्त्या वाढवा.. रस्ते बनवा.. सोय फक्त स्वत:चीच बघा.. इतरांचे काय? अनेकांचा आश्रय आज निर्दयतेने कापून काढला जातोय…तुमचा प्रवास सोपा व्हावा म्हणून तुम्ही कुणाचा तरी प्रवास संपवत आहात. लक्षात ठेवा हा प्रवास आज त्यांचा संपतोय आणि कालांतराने तुमचा देखील…,” अशा शब्दांत तेजस्विनीने संताप व्यक्त केला.

https://www.instagram.com/p/B3RBBoKgxDl/

आणखी वाचा : ”…नंतर बसा बोंबलत”; ‘आरे’तील वृक्षकत्तलीवर सईचा संताप 

तेजस्विनी आपल्या अनोख्या कलाकृतींच्या माध्यमातून समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर व्यक्त होत आहे. ती गेली दोन वर्षं नवरात्रोस्तवात वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून नारीशक्तीचा आविष्कार घडवत असते. यंदा ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवींच्या रुपातून या समस्यांवर व्यक्त होत आहे.