गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. तेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे. उत्तम अभिनेत्रीबरोबरच डिझाइनर आणि चित्रकार म्हणूनही ती ओळखली जाते. रंगभूमीवरील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची ती मुलगी. पण आईच्या पुण्याईवर या क्षेत्रात येण्यापेक्षा ती स्वत: या क्षेत्रात संघर्ष करत आली.

मराठीमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्वीनीचा इथपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. एकवेळ अशीही होती जेव्हा आम्ही अडीच महिने अंधारात राहिलो असं तेजस्विनी एका कार्यक्रमात म्हणाली होती. तेजस्विनीनं झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात तेजस्विनीनं भूतकाळातल्या अनेक आठवणी जागवल्या होत्या. “आई त्यावेळी घरातली एकटी कमावती होती. एकावेळी ती चार नाटकांत काम करायची. नाटकांतून मिळणाऱ्या पैशांत घर चालायचं. मात्र आईचे सहकलाकार प्रशांत सुभेदार यांचं निधन झाल्यानं ती चारही नाटकं बंद पडली आणि एक वेळ अशी आली की घरात फक्त १ रुपया, मैदा आणि साखर तेवढी शिल्लक राहिली. त्यावेळी त्याच मैद्याची बिस्किटं खाऊन आम्ही दिवस ढकलला होता”, असा कटू अनुभव तिनं कार्यक्रमात सांगितला होता.

“कर्जबाजारी झाल्यानं घरात वीजेचं बिल भरायलाही पैसे नव्हते. अडीच महिने आम्ही अंधारात राहिलो. लावणीचे प्रयोग नाईटवेअर कंपनीची जाहिरात करून चांगले पैसे मिळाले. या पैशांतून मी वीजबिल भरलं”, अशा अनेक आठवणी तिनं सांगितल्या. तेजस्विनीनं अभिनेता अंकुश चौधरीसोबत पहिली जाहिरात केली. त्यानंतर केदार शिंदेच्या ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून मराठी चित्रपट क्षेत्रात तिनं खऱ्या अर्थानं पाऊल ठेवलं. या चित्रपटात तिच्या वाट्याला खलनायिकेची भूमिका आली होती.