‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’ ‘बॅटमॅन ट्रायोलॉजी’, ‘डंकर्क’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारा ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील सुपरस्टार दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र नोलन चाहत्यांसाठी एक दुख:द बातमी आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे ‘टेनेट’ या त्याच्या आगामी चित्रपटाचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.

गेल्या दोन वर्षांपासून टेनेटची प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. हा चित्रपट येत्या १७ जुलैला प्रदर्शित होणार होता. यासाठी अमेरिकेतील सिनेमागृह देखील सुरु करण्याची तयारी केली जात होती. मात्र करोना विषाणूचं वाढतं संक्रमण पाहून निर्मात्यांनी अनिश्चित काळासाठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे. ख्रिस्तोफर नोलनने हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार दिलाय. त्याला सिनेमागृहांमध्येच चित्रपट प्रदर्शित करायचाय. या पार्श्वभूमीवर सद्य परिस्थिती पाहाता आता ‘टेनेट’ २०२१ मध्येच प्रदर्शित होईल असं म्हटलं जात आहे.

टेनेट हा एक सायंन्स फिक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा वेळ या संकल्पनेवर आधारित आहे. ‘टेनेट’ या शब्दाचा अर्थ सिद्धांत असा होतो. या चित्रपटात अभिनेत्री डिंपल कपाडिया व्यतिरिक्त माइकल केन, केनेथ ब्रेनॉग, एरॉन टेलर जॉनसन, क्लीमेंस पोसी आणि एलिजाबेथ डेबिकी हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. डिंपल यांच्या भूमिकेविषयी अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.