बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘ठाकरे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यामध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. तर खासदार संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून पटकथासुद्धा त्यांनीच लिहिली आहे. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी प्रेक्षकांनीही चित्रपटगृहांत गर्दी केली. सेलिब्रिटींसाठी गुरुवारी संजय राऊत यांनी विशेष स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं. आपल्याला हा चित्रपट कसा वाटला हे सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे.

‘एक कलाकार ते प्रभावी राजकीय नेता असा बाळासाहेबांचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट दमदार आहे,’ अशा शब्दांत दिग्दर्शक शूजित सरकार यांनी ‘ठाकरे’ची स्तुती केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन एखाद्या वाघाप्रमाणे डरकाळी फोडतो असंही त्यांनी म्हटलंय. नवाजुद्दीनचं अभिनय त्यांना फार आवडलं.

‘सिम्बा’ चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर असलेल्या दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ‘बाळासाहेब ठाकरेंसारखी भूमिका साकारणं ही नवाजुद्दीनवर खूप मोठी जबाबदारी होती. तो उत्तम अभिनेता आहे आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटासोबत तो हे सिद्ध करतो,’ असं रोहित शेट्टी म्हणाला. ‘नवाजुद्दीन सिद्दिकीने बाळासाहेबांच्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे,’ असं ट्विट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे.

‘ठाकरे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. या चित्रपटासोबत कंगना रणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हासुद्धा प्रदर्शित झाला आहे. तेव्हा बॉक्स ऑफीसवर कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.