अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सुरु झालेला बॉलिवूडमधील घराणेशाहीचा, मक्तेदारीचा, गटबाजीचा वाद आता विकोपाला गेला आहे. कंगना रणौत, तापसी पन्नू, अनुराग कश्यप, रणवीर शौरी असे अनेक मोठे कलाकार सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करू लागले आहेत. या सर्व गोष्टींना वैतागून ‘थप्पड’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी बॉलिवूडला रामराम केला.

‘आता बस्स झालं. मी बॉलिवूडचा राजीनामा देतो’, असं ट्विट अनुभव सिन्हा यांनी केलं. अनुभव यांच्या ट्विटरनंतर सुधीर मिश्रा व हंसल मेहता यांनीसुद्धा घराणेशाहीवरून सुरू असलेल्या वादावर टीका केली. सुधीर मिश्रा यांनी ट्विट केलं, ‘काय आहे बॉलिवूड? सत्यजित रे, राज कपूर, गुरु दत्त, ऋत्विक घातक, बिमल रॉय, मृणाल सेन, ऋषिकेश मुखर्जी, विजय आनंद, जावेद अख्तर, तपन सिन्हा, गुलजार, शेखर कपूर, केतन मेहता यांच्या सिनेमांची प्रेरित होऊन मी या इंडस्ट्रीचा भाग झालो होतो.’

सुधीर मिश्रा यांच्या या ट्विटवर उत्तर देत अनुभव सिन्हा यांनी पुढे लिहिलं, ‘चला दोन लोक बॉलिवूडमधून बाहेर. आपण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून चित्रपट बनवूयाँ. यह ले अपनी लकुटी कम्बरिया, बहुतही नाच नचायो (सुरदार यांच्या कवितेतील या ओळींचा अर्थ- ही घे तुझी काठी आणि चादर, तू मला खूप नाचवलंस.)’

या दोघांची साथ देत दिग्दर्शक हंसल मेहतासुद्धा यांनीसुद्धा ट्विट केलं, ‘सोडून दिलं. ते कधी अस्तित्वातच नव्हतं.’ अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर यांचं नाव बदललं. अनुभव सिन्हा (बॉलिवूड नाही) असं त्यांनी पुढे कंसात लिहिलं.

सुशांतच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या घराणेशाहीच्या वादावरून ते फार त्रस्त झाले होते. काही दिवसांपूर्वी ते एका म्हणाले होते, ‘सुशांतच्या आत्महत्येनंतर सुरू असलेली ही चर्चा हास्यास्पद आहे. हे दररोजचं नाटक त्रास देणारं आहे. हे कोणासाठीही चांगलं नाही, त्या मुलासाठीदेखील नाही.’