महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध हॉलिवूडमध्ये अनेक बड्या अभिनेत्रींनी आवाज उठवला होता. हार्वे वेंस्टीन यांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अभिनेत्रींनी एकत्र येऊन याविरुद्ध आवाज उठवत ‘metoo’ मोहिम सुरू केली. लैंगिक अत्याचाराविरुद्ध ब्रिटनमध्येही ‘टाइम्स अप कॅम्पेन’ सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या BAFTA 2018 ‘ब्रिटीश अॅकाडमी फिल्म अवॉर्ड’मध्येही या मोहिमेचा प्रभाव दिसला. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या सोहळ्यासाठी सगळेच काळ्या कपड्यात सोहळ्याला आले होते. पण युवराज्ञी केट मिडलटनने मात्र काळी वस्त्रे परिधान न करता ऑलिव्ह ग्रीन रंगाचा गाऊन परिधान करत रेड कार्पेटवर उपस्थिती लावली.

तिचा हा पेहराव पाहून स्त्रियांविरोधात होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या टाइम्स अप मोहिमेला केटचं समर्थन नाही, असा अर्थबोध अनेकांनी यातून घेत तिच्यावर टीका केली. पण तिची काळी वस्त्रे परिधान न करण्यामागे अनेक गोष्टी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींना  राजकीय प्रचाराविषयी कोणातेही वक्तव्य करण्यास किंवा मत मांडण्यास मज्जाव आहे. राजपरिवारातील शिष्टाचारात असं मतपरिवर्तन करण्यास परवानगी नाही. तसेच फक्त दुखवटा किंवा अत्यंयात्रेच्यावेळीच काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची राजघराण्यातील व्यक्तींना परवानगी आहे. म्हणूनच राजकीय शिष्टाचार पाळत केट या सोहळ्यासाठी काळी वस्त्रे परिधान न करता आल्याचं म्हटलं जात आहे.