अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे. आज ४ नोव्हेंबर रोजी तब्बूचा वाढदिवस आहे. वयाच्या ४८ वर्षी देखील तब्बू सिंगल आहे. पण तिने लग्न का केले नाही? हे गुपित आजही उलगडलेले नाही.
तब्बूला अनेक वेळा मुलाखतींमध्ये लग्न न करण्याचे कारण विचारण्यात आले होते. मात्र तब्बून मौन सोडलेले नाही. एका इव्हेंटमध्ये खुद्द अजय देवगणने तब्बूने अविवाहित राहण्या मागील कारण सांगितले होते. ‘तब्बूला आतापर्यंत माझ्यासारखा मुलगा मिळालाच नाही. म्हणून ती अजूनही अविवाहित आहे’ असे मजेशीर उत्तर अजय देवगणने दिले होते. अजयचे हे मजेशीर उत्तर त्यावेळी जरी प्रेक्षकांना पटले असले तरी तब्बूच्या चाहत्यांमध्ये मात्र ती विवाहबंधनात का अडकत नाही हा प्रश्न कायमच आहे.
तब्बूने हिंदीसह तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृ्ष्टीमध्ये देखील काम केले आहे. आता पर्यंत दोन वेळा तब्बूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बूने वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. तिचा ‘हम नौजवान’ हा पहिलावहिला चित्रपट आहे. या चित्रपटात देवानंद मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्या मुलीची भूमिका तब्बूने वटवली होती.