एखाद्याच्या हातून कळत-नकळत गुन्हा घडतो. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा होते. शिक्षा भोगून तो जेव्हा परत येतो तेव्हा तेव्हा त्याचे कुटुंब, त्याचा समाज त्याला मनापासून स्वीकारतात का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. मग हा प्रश्न केवळ तुरुंगातून परतलेल्या माणसांपुरता मर्यादित आहे का? तर तसं नाही. आपला समाज एवढा पूर्वग्रहदूषित असतो, की तो स्वत: बदल घडवत नाही आणि एखादा खरोखरच आंतर्बाहय़ बदलू पाहत असेल तर त्याला मदतही करत नाही. आपल्या समाजाच्या याच कमकुवतपणावर ‘द ब्लॅक शीप’ हा लघुपट बोट ठेवतो.
अनमोल धर्माधिकारी या तरुण दिग्दर्शकाचा ‘द ब्लॅक शीप’ हा लघुपट १३ मेपासून सुरू होणाऱ्या ‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या ‘शॉर्ट फिल्म कॉर्नर’मध्ये देशभरातील ४० लघुपटांची निवड झाली आहे ज्यात अनमोलच्या ‘द ब्लॅक शीप’चा समावेश आहे. मुंबईत आयआयटीमध्ये काम करणाऱ्या अनमोलने याआधी केलेल्या ‘द स्वीट सेलर’ आणि ‘अंतर’ मधील ‘द स्वीट सेलर’ हा लघुपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. ‘द ब्लॅक शीप’ या तिसऱ्या लघुपटाच्या कथेवर खूप दिवस काम केलं आहे. या कथेसाठी संदर्भ, अभ्यास आणि संशोधनही खूप केले असल्याचे अनमोलने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
या विषयावर संशोधन करत असताना मला धुळ्यात असाच एक तरुण भेटला. तो धुळ्यात रिक्षा चालवायचा. तो कुठल्याशा गुन्हय़ासाठी तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगून घरी परत आला होता. मात्र, तो घरी आला तेव्हा त्याच्या घरच्यांचं वागणं, बाहेरच्या लोकांचं वागणं हे प्रचंड बदललेलं होतं, असं अनमोल सांगतो. मी स्वत: नगरजवळ विसापूरच्या तुरुंगात जाऊन तेथील तुरुंगाधिकाऱ्याच्या ओळखीने दोन कैद्यांची भेट घेतली, त्यांच्याशी बोललो. ज्येष्ठ लेखिका गिरीजा कीर यांनी येरवडय़ातील कैद्यांवर एक कादंबरी लिहिली होती. कीर यांना भेटून त्यांचं काम आणि या विषयावरचे त्यांचे अनुभव जाणून घेतले. डोस्टोव्हस्कीची याच विषयावरची कादंबरी वाचली. हा विषय वैश्विक आहे. समोरचा माणूस स्वत:त बदलण्यासाठी कितीही प्रयत्न करत असला तरी समाजाला समोरच्याच्या वागण्यातला बदल कधीच जाणवत नाही आणि आपण त्याला पुन्हा माणसांत येण्याची संधीच नाकारतो, हा खरं तर ‘द ब्लॅक शीप’चा विषय असल्याचे अनमोलने सांगितले.
लघुपटाच्या प्रदर्शनामुळे ‘कान’मध्ये भरणारी चित्रपटांची बाजारपेठ पाहता येईल, तेथील वितरकांशी थेट संवाद होईल. महोत्सवाचे असे फायदे आहेत, असं अनमोल सांगतो. लघुपटानंतर फीचर फिल्मचीही तयारी त्याने सुरू केली आहे. पटकथा लिहून तयार आहे. आता निर्मात्याच्या शोधात असल्याचे त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th May 2015 रोजी प्रकाशित
‘द ब्लॅक शीप’ची गुंज ‘कान’ महोत्सवात
एखाद्याच्या हातून कळत-नकळत गुन्हा घडतो. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा होते.
First published on: 05-05-2015 at 06:18 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The black sheep in cannes