सेन्सॉर बोर्डाकडून ‘यू/ए’ प्रमाणपत्र
रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’चा नवा थ्रीडी अवतार पाहण्यासाठी बच्चेकंपनीला आईबाबांबरोबरच चित्रपटगृहात प्रवेश मिळणार आहे. अबालवृध्दांना भावणाऱ्या मोगलीच्या कथेचा डिस्नेकृत नवी ‘सीजी’(कॉम्प्युटर ग्राफिक)आवृत्ती पाहताना लहान मुले घाबरू शकतात, असे सेन्सॉर बोर्डाला वाटते आहे. त्यामुळे अमेरिके प्रदर्शित होण्याच्या आठवडाभर आधी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘यू/ए’ प्रमाणपत्र दिले आहे.
‘द जंगल बुक’ची मुळे ही भारतीय आहेत. त्यामुळे या चित्रपटाला इथे जास्त प्रतिसाद मिळेल, हे लक्षात घेऊन जॉन फेरावू दिग्दर्शित ‘द जंगल बुक’ हा चित्रपट हिंदी भाषेत, हिंदी कलाकारांच्या आवाजात प्रदर्शित व्हावा, या विचाराने निर्माते ‘डिस्ने स्टुडिओ’ यांनी हरएक प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून चित्रपट अमेरिकेत आधी प्रदर्शित न करता इथे प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र, या चित्रपटाचा आशय भयावह नसला तरी त्यात वापरण्यात आलेल्या थ्रीडी तंत्रज्ञानामुळे त्यात दाखवण्यात आलेल्या प्राण्यांच्या उडय़ा आणि तत्सम दृश्यांनी लहान मुले घाबरू शकतात, असे सांगत पहलाज निहलानी यांच्या अध्यक्षतेखालील सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला ‘यू/ए’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे १२ वर्षांखालच्या लहान मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी पालकांबरोबरच जावे लागणार आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाबद्दल बॉलीवुडमधील मुकेश भट, आयुषमान खुराणा सारख्या निर्माते, कलाकारांनी राग व्यक्त केला आहे. मात्र याप्रकरणी डिस्ने स्टुडिओने कुठलाच आक्षेप घेतला नसल्याचे चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.