अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचं नाव टेलिव्हिजन विश्वासाठी नवं नाही. ‘बडे अच्छे लगते है’, ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि अशा बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सुमोना सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच, आपल्या खास मित्रमंडळींसोबतही तिला धमाल करताना पाहिलं गेलं होतं. पण, सध्या तिने इन्स्टाग्रामवर केलेली पोस्ट पाहता, सुमोना चांगलीच अडचणीच आल्याचं स्पष्ट होत आहे.

वेळ कमी असल्यामुळे आणि आपल्या नेहमीच्या पार्लरमध्ये जाता न आल्यामुळे सुमोनाने ऑनलाईन वॅक्सिंग प्रोडक्टचा वापर केला. मुख्य म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाईन व्यवहारापासून बऱ्याच गोष्टींसाठीच्या सुविधाही पुरवल्या जातात. अशाच एका प्रोडक्टची निवड सुमोनाने केली. पण, त्याच प्रोडक्टमुळे तिच्या त्वचेवर लाल रंगाचे चट्टे आले असून, संवेदनशील भागामध्ये तिला हलकीशी इजा झाल्याचं कळत आहे. सुमोनाने याविषयी संताप व्यक्त करत एक पोस्ट केली. ज्यामध्ये तिने आपल्याला झालेल्या इजेचे फोटोही पोस्ट केले आहेत. त्यासोबतच सेलिब्रिटी अशा प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींमध्ये सहभागी होतात ही बाब हेरत तिने अशा कोणत्याही चुकीच्या प्रोडक्टचं प्रमोशन न करण्याचं आवाहन केलं आहे.

वाचा : चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

सुमोनाने केलेली ही पोस्ट पाहता अनेकांचेच डोळे उघडले असून, आता ऑनलाईन खरेदी करतेवेळी ग्राहक पुन्हा पुन्हा त्या गोष्टींची पडताळणी करुन पाहतील, अशीच अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे. सोशल मीडिया आणि जाहिरातीसाठी उपलब्ध शक्य त्या सर्व माध्यमांतून हल्ली बऱ्याच नव्या आणि प्रभावी प्रोडक्ट्सची विक्री करण्यात येते. किंबहुना त्याला ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर मागणीही असते. पण, उद्योग आणि नफ्याच्या या साऱ्या गणितामागे काही सेवांची पडताळणी होणं गरजेचं असून, ग्राहकांनीही प्राथमिक पातळीवर याची काळजी घ्यावी.