राम गोपाल वर्मा बॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’, ‘रंगीला’, यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या आयुष्यावर आधारित आहे.

‘द मॅन हू किल्ड गांधी’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं पहिलंच पोस्टर वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या पोस्टरमध्ये महात्मा गांधी व नथुराम गोडसेचा फोटो मिक्स करण्यात आला आहे. “या दोन व्यक्तींना एकत्र केलंय कारण गांधींची हत्या करुन नथुरामने आपल्या मृत्यूला आमंत्रण दिलं होतं.” अशा आशयाची कॉमेंट या पोस्टरवर राम गोपाल वर्मा यांनी केली होती. मात्र ही कल्पना अनेकांना आवडली नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे या पोस्टरला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी या कृत्यासाठी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. काही जणांनी तर लांबलचक लेख पोस्ट करुन आपला विरोध दर्शवला आहे. सातत्याने होणाऱ्या या विरोधावर रामूंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “चित्रपट पाहिल्यांनंतरच तुम्हाला या पोस्टरचा खरा अर्थ कळेल.” असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे. सध्या हे पोस्टर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.