03 March 2021

News Flash

संगोपन विज्ञान!

जगभरात कुटुंब विनोदपटांचा ठरलेला एक साचा असतो.

जगभरात कुटुंब विनोदपटांचा ठरलेला एक साचा असतो. विनोदाचा अतिसोस ठेवण्यापलीकडे फारसे प्रयोग हे चित्रपट करताना दिसत नाहीत. त्यात कुटुंबातल्या तऱ्हेवाईक व्यक्तिरेखांच्या कर्तबगारीच्या किंवा अपकीर्तीच्या गोष्टींना भरपूर वाव दिला जातो. अपवाद म्हणून नावे घेता येतील अशा ‘लिटिल मिस सनशाइन’ नावाच्या गोजिऱ्या सिनेमामध्ये एका लहान मुलीला सौंदर्य स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी दूरच्या शहरात निघालेल्या कुटुंबातील तीन पिढय़ांपैकी प्रत्येकाची एक एक त्रांगडेबाज गोष्ट प्रवासभर उकलत राहते. दिग्दर्शक वेस अ‍ॅण्डरसन याच्या ‘रॉयल टिननबम’ या चित्रपटामध्ये कोकणी किंवा पुणेरी तिकडमपणाला मागे टाकणारे एकाच कुटुंबातील व्यक्तिसमूह कित्येक वर्षांनी वेगवेगळ्या कारणांनी एकत्र येऊन कथानकात धांदल उडविताना दिसतात. पारंपरिक कौटुंबिक चित्रपट नात्यांमधील हेवेदावे, राग-द्वेष यांच्या आधारे निवळू शकणाऱ्या तणावाची अल्पजाणीव करून प्रेक्षकाला गोड शेवटाकडे नेत टाळीफेक आणि ‘निखळ’ वगैरे ( विशेषणायुक्त पुरते) मनोरंजनाचा आनंद देतो. कौटुंबिक सिनेमा भारतीय असला, तर त्यात ‘संस्कार’, ‘पवित्रता’, ‘बुजूर्गोका सन्मान’, ‘कुर्निसात आणि नमन’ आदी ‘विनोदी’ गोष्टींचा मूळ विनोदी कथानकात अंतर्भाव केला जातो.

दिग्दर्शक इमॅन्युअल होस-डेस्मराईस याचा ‘बर्थमार्क्ड’ हा चित्रपट वर उल्लेख  केलेल्या चित्रपटांची मनोरंजनाची पारंपरिक वळणे टाळणारा कुटुंबपट आहे. मुळात मुलांच्या संगोपनातील विज्ञानावर चित्रपट बनवणे हीच गमतीशीर कल्पना आहे. उत्तम संगोपनामुळे किंवा लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या भवतालामुळे ती हवी तशी घडविता येऊ शकतात हे अलीकडे आपल्याकडच्या नव किंवा सर्व दाम्पत्यांमध्ये ‘संस्कार फॅडा’च्या माध्यमाने रुजत चालले आहे. ‘बर्थमार्क्ड’ हा संपूर्ण चित्रपट संगोपन विज्ञानाच्या त्या संस्कार प्रक्रियेकडे गमतीने पाहतो.

बर्थमार्क्ड चित्रपटाचा आरंभ होतो १९७७ सालापासून. अमेरिकेतील हिप्पी संस्कृतीतून निपजलेल्या ‘हिपस्टर्स’ पिढीपासून. या पिढीचे प्रतिनिधी असलेले दोन समविचारी संशोधक-वैज्ञानिक कॅथरीन (टोनी कलोट) आणि बेन (मॅथ्यू गुड) कुटुंबाचा आणि पालकत्वाचा एक वेगळा प्रयोग करण्यासाठी एकत्र येतात. निसर्गाच्या सान्निध्यात ते आपल्या स्वत:च्या अपत्यासोबत इतर दोन मुलांना दत्तक घेऊन वाढविण्याचा कार्यक्रम आखतात. कमी बुद्धय़ांकासाठी ओळखलेल्या घरातील लहान मुलीला आपल्या प्रयोगांद्वारे सर्वात बुद्धिमान म्हणून वाढविण्याचा तर हिंसेचा प्रचंड मोठा इतिहास असलेल्या घरातून दत्तक घेतलेल्या मुलाला सर्वाधिक शांत आणि सहिष्णू बनविण्याचा चंग बांधतात. पाळण्यात असल्यापासूनच आपल्या मुलाला कलाकार म्हणून घडविण्यासाठी बालामृत देऊ लागतात. या सर्व प्रयोगासाठी त्यांना गेर्ट्झ नावाच्या गडगंज श्रीमंत वैज्ञानिकाकडून आर्थिक पाठबळ मिळते. शहरी जगापासून दूर असलेल्या त्यांच्या बर्फाच्छादित घरात शिक्षणापासून साऱ्या सुविधा या मुलांना पुरविल्या जातात. त्यांना रीतसर घडविण्यात सामसोनोव्ह नावाचा या दाम्पत्याइतकाच तऱ्हेवाईक सहकारीही पुरविला जातो. चित्रपटामध्ये वेगातच १०-१२ वर्षांचा कालावधी जाऊन दाम्पत्याच्या प्रयोगाबरहुकूम जडण-घडण झालेली मुले गेर्ट्झसमोर उभी केली जातात. तेव्हा ही मुले सर्वसाधारण मुलांसारखीच असून, प्रयोगाला कसलेच यश आले नसल्याचा पाणउतारा गेर्ट्झ करतो. वर दाम्पत्याला प्रयोगासाठी खर्च केलेली सगळी रक्कम परत देण्यास सांगतो.

या दरम्यान पौंगडावस्थेत आलेली पोरे आपल्यावरील संस्कार अतिरेकाने आधीच कातावून गेलेली असतात. त्यात गेर्ट्झच्या शेऱ्यामुळे तिन्ही मुलांवर आणखी नवे संस्कार राबवण्यास सज्ज झालेल्या दाम्पत्याच्या विरोधात जाऊन ती बंड पुकारतात. निसर्गाच्या सान्निध्यातील  जडण-घडण केंद्रातून ती पळ काढतात. यामुळे दाम्पत्याच्या प्रयोगाला वेगळे वळण लागते आणि गोष्टी बिघडू लागतात.

‘बर्थमार्क्ड’च्या विनोदाची जातकुळी वेगळी आहे. यातील सारे प्रयोग मुलांमध्ये उच्च बुद्धिमत्ता निर्माण करण्यासाठीचे आहेत. मुलांची जडण-घडण त्यांना कुठे आणि कसे वाढविले जाते, त्यावर उत्तमरीत्या होते, हे दाखविणाऱ्या वैज्ञानिक दाम्पत्याबाबत मुलांमध्ये विकसित होत जाणाऱ्या रागाचा विकास अनेक गमती घडवितो. यातील पोरांनी दाम्पत्याच्या गुप्त फडताळ्यातून पैदा केलेल्या ‘पेण्टहाऊस लेटर्स’वर  बसविलेले नाटक, आपल्या कलावंत म्हणून घडवू पाहणाऱ्या पौंगडावस्थेतील मुलाला अनावृत स्त्रियांची छायाचित्रे दाखवत मानसिक ऊर्जा कलात्मकतेकडे वळविण्याचे बेनचे प्रयत्न आणि कित्येक तिकडम संकल्पनांद्वारे  संस्कार प्रयोगांची खिल्ली उडविण्याचे प्रयत्न जमलेले आहेत.

‘बर्थमार्क्ड’ आवडण्यासाठी आणखी एक कारण म्हणजे टोनी कलोट या सशक्त अभिनेत्रीचा वैज्ञानिक मातेच्या रूपातील इथला वावर. म्युरेल्स वेडिंग, जापनीज स्टोरी या देखण्या ऑस्ट्रेलियाई सिनेमांपासून हॉलीवूडच्या छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर सातत्याने वावर असणाऱ्या या अभिनेत्रीने वठविलेली रांगडी आणि तरी मुलांच्या संगोपनाबाबत हळवी आणि दक्ष कॅथरीन प्रचंड जमली आहे.

आज सगळ्या जगामध्ये बालसंगोपनाच्या नावाने तयार झालेल्या प्रयोगशाळांचा उद्योग भरभराटीला आलेला असताना इथला संगोपन विज्ञानाचा रंजक धडा थेट काही  न बोलता खूप सारे विनोदी प्रयोगांनी सिद्ध करतो. अगदी थोर नसला, तरीही पुरेसे मनरंजन घडविण्याची क्षमता या चित्रपटात नक्कीच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:43 am

Web Title: the royal tenenbaums
Next Stories
1 गोष्ट आर्थिक माफियांची
2 मराठी ‘बिग बॉस’१५ एप्रिलपासून
3 ‘गुलमोहर’मध्ये नवीन जोडी रोहन गुजर आणि आरती मोरे
Just Now!
X