News Flash

गडद प्रेमफॅण्टसी!

सर्वाधिक गटांमध्ये पुरस्काराचा दावेदार ‘शेप ऑफ वॉटर’ ठरला.

यंदाच्या ऑस्कर चित्रपटांची नामांकन यादी जाहीर झाल्यानंतर त्यात सर्वाधिक गटांमध्ये पुरस्काराचा दावेदार ‘शेप ऑफ वॉटर’ ठरला. अन् त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच त्याच्यावर कथाचोरीपासून ते अनेक आरोप झाले. त्यामुळे चित्रपटाच्या गुणवत्तेऐवजी आणि त्यातल्या सौंदर्यस्थळांऐवजी नको त्या चर्चेला आणि वादाला आरंभ झाला आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहता सर्वाधिक नामांकने असलेल्या चित्रपटाचे मानाचे सारे पुरस्कार भलत्याच चित्रपटाला मिळतात. (गेल्याही वर्षी विक्रमी चौदा नामांकने असलेला ला लॅण्डचा सवरेत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान नाटय़पूर्णरीत्या मुनलाइटने पटकावला) ‘थ्री बिलबोर्ड..’चा झंजावत ऑस्कर नामांकने आणि पुरस्कार याबाबत रूढ होऊ पाहणारा शिरस्ता मोडणार नाही, याची खात्रीच देत आहे. असे असतानाही सर्वाधिक १३ नामांकने मिळविणाऱ्या ‘शेप ऑफ वॉटर’मध्ये नक्की आहे काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

गिलिआर्मो डेल टोरो हा मेक्सिकन चित्रकर्ता त्याच्या गडद फॅण्टसींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचे सिनेमे पाहिले तर ज्ञात परिकथांच्या संदर्भाचे विच्छेदन करून त्यांची डेल टोरोच्या नजरेतील पुनर्माडणी वाटू लागते. पॅन्स लॅबिरिन्थ पाहताना डोक्यात धुरकटपणे अ‍ॅलिस इन वण्डरलॅण्ड आठवू शकेल किंवा हेलबॉय पाहताना ‘ब्युटी’ वगळलेला ‘बीस्ट’ डोक्यात येईल. तर ‘शेप ऑफ वॉटर’मध्ये सांगितलेली गोष्ट शेकडो सिनेमांमधून परिकथांमधून आणि लघुकथांमधून आलेली आहे. गेल्याच वर्षी ‘ओकजा’ नावाच्या महाकाय डुक्करावरच्या चित्रपटातून पर्यावरण ऱ्हासाची, खलप्रवृत्तीय मानवी विध्वंसाची आणि सत्प्रवृत्तीय मानवी प्रेमाची गोष्ट दाखविण्यात आली होती. टॉम हॅन्क्सच्या सुरुवातीच्या स्प्लॅॅश या चित्रपटात (जेव्हा तो अधिकच आमिर खानसारखा  दिसे) देखील मानव आणि मत्स्यकन्येच्या प्रेमाची खरोखरीच ‘अजब दास्तान’ या विशेषणाला जागणारी कथा होतीच. डेल टोरोच्या शेप ऑफ वॉटरमध्ये नवीन आहे ती मानव आणि मानवासारख्याच दिसणाऱ्या विचित्र समुद्री जिवाच्या प्रेमकहाणीची मांडणी. बिनसंवादाची. कारण इथली नायिका ही मुकी आहे आणि नायक आहे मानवी भाषेची सुतराम कल्पना नसलेला विचित्र जीव. त्यामुळे संपर्काच्या आणि प्रेमविकासाच्या पातळ्यांचा प्रवाह इथला महत्त्वाचा भाग आहे. इथल्या झाडून साऱ्या व्यक्तिरेखा वैशिष्टय़पूर्णरीत्या अभावग्रस्ततेतून एकलकोंडय़ा बनलेल्या आहेत. परिणामी या प्रेमकथेला स्वाभाविकपणे डेल टोरोच्या सिनेमांमधील गडदत्व आले आहे. चित्रपटाचा कालावधी हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा आहे. अमेरिका आणि रशियाच्या शीतयुद्धकाळातील संशोधन- वैज्ञानिक हेरगिरीचा संदर्भ यात गंमतीशीररीत्या वापरण्यात आला आहे.

चित्रपट सुरू होतो तो एलिसा (सॅली हॉकिन्स) या गुप्त अमेरिकी प्रयोगशाळेमध्ये सफाईचे काम करणाऱ्या नायिकेच्या दिवसाच्या आरंभापासून अंताच्या दर्शनार्प्यत. फारच मोकळ्या-ढाकळ्या स्वरूपात स्नानोत्तर कर्मदर्शन करून झाल्यावर ती आपल्या गाईल्स (रिचर्ड जेनकिन्स) चित्रकार मित्राला न्याहारी घेऊन जाते. हा प्रौढवयीन मित्र आपल्या कलेला न मिळणाऱ्या पुरेशा प्रसिद्धीने, ‘गे’पणाने आणि प्रेमकफल्लकतेने नैराश्याच्या पातळीवर आलेला आहे. तो एलिसाची हातवाऱ्यांची भाषा जाणू शकतो, हीच त्यांच्या मैत्रीची खूण. त्याच्याकडे टीव्ही वगैरे पाहून झाल्यानंतर ती प्रयोगशाळेत सफाईच्या कामासाठी दाखल होते. तिकडे झेल्डा (ऑक्टोव्हिया स्पेन्सर) या बोलघेवडय़ा मैत्रिणीसोबत तिचे कामाचे तास संपल्यानंतर सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे घरी परतताना ती खिडकीच्या काचेवर डोके ठेवून विसावा घेते. एलिसाचा एकटेपणा तिरकसपणे मांडणारा हा दिनक्रम अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने आला आहे. एलिसाच्या वृक्ष दैनंदिन जगण्यात अचानक बदल होतो तो प्रयोगशाळेत अतिदक्षतेत आणण्यात आलेल्या विचित्र द्विपाद प्राण्यामुळे. अमेझॉनच्या जंगलातून पकडण्यात आलेला हा प्राणी माणसासारखाच चालू शकतो. पण पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असतो. सफाईच्या निमित्ताने या द्विपाद प्राण्याशी हातवाऱ्यांच्या भाषेत ओळख करून घेणारी एलिसा त्याच्याशी मैत्री करते आणि या मैत्रीमुळे तिच्या आयुष्याच्या प्रवासात (आणि रोजच्या दिनक्रमातही) रंग भरला जातो. प्रयोगशाळेचा निर्दयी मालक रिचर्ड (मायकेल शेनॉन) त्या प्राण्याला मारून टाकण्याच्या कामाला लागतो. तेव्हा एलिसा गाईल्सच्या मदतीने त्या प्राण्याला प्रयोगशाळेतून पळवून घरी आणते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते पुढे साऱ्या गोष्टी आधी पाहिलेल्या ऐकलेल्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींबरहुकूम घडू लागतात.

स्पीलबर्गच्या इटीपासून ते मॉन्स्टर्स मूव्हीजमधील विचित्र प्राण्यांसारखा इथला द्वीपाद प्राणी नाही. तो परग्रहवासी नाही किंवा राक्षसही नाही. चित्रपटातील अभावग्रस्त व्यक्तीरेखांसारखाच तो एकटेपणाचा शिकार आहे. त्याची शरीररचना चमत्कारांसाठी तयार केलेली नाही. जरी त्याने त्रोटक चमत्कार करून दाखविले असले, तरी त्याचे स्वरूप बाळबोध स्वरूपाचे नाहीत. कोणताही संदेश वगैरेच्या भानगडीत न पडता या चित्रपटाला तब्बेतीत फॅण्टसी मांडायची आहे. अन् ती कशी मांडलीय याची पावती ऑस्करच्या नामांकनातून मिळाली आहे. पुरस्कारात चित्रपटाची किती आणि कोणत्या नामांकनात सरशी होते, हे महत्त्वाचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2018 1:29 am

Web Title: the shape of water
Next Stories
1 मुकुटातली घुसमट
2 आम्ही कात टाकली!
3 ‘सवाई’मध्ये ‘निर्वासित’ची बाजी
Just Now!
X