|| निलेश अडसूळ

‘मालिका’ क्षेत्रावर नजर फिरवताना खल भूमिकांचा विचार केला तर सगळ्या ‘खलनायिका’ डोळ्यांपुढे पुढे उभ्या राहतात. अर्थात याला काही मालिका अपवाद आहेत. पण मालिका म्हणजे चुलीपुढचे राजकारण आणि कुरघोडय़ा करून मालिकेला रंगत आणणाऱ्या खलनायिका असे सामान्य आणि परिचित समीकरणच आपल्याला ठाऊक असते. सध्या सुरू असलेल्या मालिका पाहिल्या तर त्यामध्ये खलनायिकेपेक्षा ‘खलनायक’ अधिक वरचढ होताना दिसत आहेत. सध्या हे खलनायकही रसिकांच्या मनात घर करत आहेत. अशाच काही मालिकांमधला भावलेला ‘पुरुषी खल’..

झी मराठी वाहिनीवर याचा खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो. कारण ‘देवमाणूस’ आणि ‘रात्रीस खेळ चाले’ या दोन्ही लोकप्रिय मालिका खलप्रवृत्तीभोवती फिरणाऱ्या आहेत. तर नुकत्याच सुरू झालेल्या ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत शशांक केतकर नायकाच्या भूमिकेत असला तरी त्याचा मूळ गुणधर्म खलनायकाचा आहे. ‘कारभारी लय भारी’ या मालिकेतही पुरुषी खल आहेच. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत पुरोगामी विचारांची कास धरणारा सौमित्र ज्याने साकारला तो अभिनेता-दिग्दर्शक अद्वैत दादरकरही सध्या ‘अगंबाई सुनबाई’ या मालिकेत सोहमच्या रूपाने खलप्रवृत्तीच साकारतो आहे.

‘देवमाणूस’ मालिकेतील डॉ. अजितकुमार देव आणि ‘रात्रीस खेळ चाले’मधील अण्णा नाईक या खलनायकांनी सध्या भलतीच लोकप्रियता मिळवली आहे. लोकांपुढे ‘देवमाणूस’ म्हणून वावरणारा पण प्रत्यक्षात गुन्हेगार असलेला ‘डॉक्टर’ अशी दुहेरी बाजू अभिनेता किरण गायकवाड याने सांभाळली आहे. याआधीही ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत किरणने हर्षवर्धन ऊर्फ भय्यासाहेब ही खलभूमिका साकारली होती.

‘आधीच्या मालिकेत साकारलेले पात्र जरी नकारात्मक असले तरी दोन्ही पात्र एकमेकांपासून पूर्णत: वेगळे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. भय्यासाहेबांची ओळख पुसून ‘डॉक्टर’ ही नवी ओळख तयार करायची होती, ज्यात मी यशस्वी झालो. लोक खल भूमिकांवरही भरभरून प्रेम करतात, शिव्या देतात. कदाचित त्याच शिव्या हे आपल्या कामाचे प्रतीक आहे. भय्यासाहेब जितका उग्र होता तितकाच डॉक्टर शांत आहे. त्याच्या खलकृतीआधीही त्या डोळ्यांतून दाखवणे ही कसब आहे, ज्यासाठी दिग्दर्शकांनी खूप सहकार्य केले. खल भूमिका कधीच सारख्या नसतात. प्रत्येक व्यक्तीचा आत्मा, स्वभाव, त्याच्यावर समाजाचा असलेला प्रभाव यातून तो घडत असतो. त्यामुळे यापुढेही अशा भूमिका करेन पण साचेबद्धतेत अडकायला आवडणार नाही,’ असे किरणने सांगितले.

तर गेलं पर्व ज्या व्यक्तीभोवती मालिका फिरते आहे ते ‘अण्णा नाईक’ म्हणजे अभिनेते माधव अभ्यंकर सांगतात, ‘अण्णा नाईक हा असा खलनायक आहे ज्याला कोणताही खलनायकाचा आविर्भाव नाही. त्याचं सामान्य जीवन हेच अशा अमानुष कृत्यांनी भरलेले आहे. त्याचे चालणे, बोलणे, वावरणे यात कोणताही खल नाही. त्यामुळे तो सामान्यही तरीही वेगळा आहे, हे दाखवण्याचे आव्हान माझ्यावर होते.’ आधीच्या तिन्ही पर्वातले अण्णा आणि त्यांची जबाबदारी विषद करताना ते म्हणाले, ‘पहिल्या पर्वात अण्णा, पहिल्याच भागात मरतात आणि अण्णा कसे होते यावर भाष्य केले आहे. दुसऱ्या पर्वात अण्णा नाईकाने काय काय केले याचा विस्तृत आढावा आहे. आणि तिसऱ्या पर्वात त्याची मरणोत्तर बाजू आहे. त्यामुळे तीन पर्व वेगळ्या कथा आणि एक नायक असल्याने भूमिकेत सातत्य राखणे ही महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर होती,’ असे त्यांनी सांगितले.

‘चंद्र आहे साक्षीला’मधील श्रीधर, ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील दौलत, ‘राजा रानीची गं जोडी’मधील पंजाबराव किंवा ‘जीव झाला येडापिसा’मधील भावे, अशा दर्जेदार खलभूमिका सध्या कलर्स मराठीवर गाजत आहेत. अभिनेता सुबोध भावे यांनी आजवर अनेक खलभूमिका साकारल्या आहेत, पण ‘श्रीधर’ ही त्यात अधिक उजवी वाटते. ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा श्रीधर हे पात्र वाचूनच ते आव्हानात्मक वाटले. मालिका चिन्मय मांडलेकर लिहीत असल्याने त्याच्या लिखाणावर माझा पूर्ण विश्वास होता म्हणून ही भूमिका स्वीकारली. ते पात्र समजून मी माझ्या बाजूने रंग भरतोच आहे, म्हणूनच कदाचित लोकांना या पात्राचा राग येतो आहे. जेव्हा लोकांना आमच्या खलभूमिकांचा राग येतो तेव्हा ते योग्य दिशेने साकारले जात आहे असे समजावे. अर्थात अशा पात्रांचे समर्थन करणे हा कलाकाराचा हेतू नसतो, परंतु समाजात असलेली अशी माणसे लोकांपुढे आणण्याचे काम या माध्यमातून होते,’ असे सुबोध भावे यांनी सांगितले. या पात्राचा लोकांना प्रचंड राग येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यानंतर काही काळ खलभूमिका करणार नाही, असेही ते म्हणाले.

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतील मुख्य खलनायिका ‘आत्याबाई’ असल्या तरी त्यांचे सहकारी ‘भावे’ यांची जोरदार चर्चा आहे. ‘आत्याबाई’ हे पात्र चिन्मयी सुमीत यांनी साकारले असून ‘भावे’ हे पात्र हेमंत जोशी यांनी साकारले आहे. हेमंत जोशी यांचे विशेष म्हणजे २०१५ मध्ये बँकेतून निवृत्त होऊन त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द सुरू केली. त्यांचा आवाज, नजरेतील बेरकीपणा, चेहऱ्यावरील छटा या चटकन लोकांना भावणाऱ्या आहेत. भावे या पात्राचे श्रेय त्यांनी इतरांना अर्पण केले आहे. ‘हे पात्र मी साकारले असले तरी त्यामागे अनेकांची मेहनत आहेत. लेखक चिन्मय मांडलेकर, निर्माते-दिग्दर्शक विनोद लव्हेकर, पुष्कर रासम यांनी पात्राची एकूण उकल मला करून दिली. विशेष म्हणजे अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी मला भूमिकेचा आवाका, गरज याची जाणीव करून दिली. आज घराबाहेर पडल्यावर लोक भावे म्हणून हाक मारतात तेव्हा आनंद होतो,’ असे त्यांनी सांगितले.

‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतही हेमंत जोशी यांची ‘धनु मामा’ म्हणून एण्ट्री झालेली आहे. एक दारूडा, भामटा मामा, भाचीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय काय उपद्व्याप करतो आहे, हे लवकरच प्रेक्षक पाहतील. त्यामुळे सध्या जोशी यांच्या खलभूमिका कलर्स मराठीवर महत्त्वाच्या ठरत आहेत. विशेष म्हणजे ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातदेखील त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या निर्मात्याची भूमिका  साकारली होती. ‘ऑडिशन संभाजीची आहे. संभाजी, म्हणजे सहा फूट उंची आणि पिळदार देहयष्टी’ या त्यांच्या आवाजातील संवादाने चित्रपटाच्या प्रोमोला घराघरात पोहोचवले.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ आणि ‘मुलगी झाली हो’ या दोन मालिकांमध्ये असलेले मुख्य पात्र त्यांच्या स्वभावगुणधर्मानुसार लोकांना खलनायक वाटतात. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील विलास म्हणजे मुलीच्या बापाची भूमिका साकारणारे ‘किरण माने’ हे खलनायकसदृश पात्र साकारत आहेत. माने यांचा अभिनय समाजमाध्यमांवर अनेक दिग्गजांकडून वाखाणला जातो आहे. तर बायकोवर अन्याय करणारा, विवाहबाह्य़ संबंध ठेवणारा अनिरुद्ध  देशमुख लोकांना मालिकेचा खलनायक वाटतो. पण तोही एक नायकच असल्याचे अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे मिलिंद गवळी सांगतात. ‘मुळात हा नायक आहे. जो समाजातील इतर पुरुषांसारखाच आहे. परंतु त्याच्या एका निर्णयामुळे तो लोकांना खलनायक वाटतो. त्याचा त्याच्या मुलांवर, घरावर प्रचंड जीव आहे. फक्त तो संसारात असतानाही एका स्त्रीच्या प्रेमात पडला आणि त्याच्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडत गेले. अर्थात ते लोकांना पचनी पडणारे नसल्याने तो खलनायक वाटतो. परंतु त्याचीही एक बाजू आहे, त्याचाही एक विचार आहे, तो मांडण्याची त्याची धडपड आहे. जी येत्या भागात स्पष्ट होईल,’ असे मिलिंद यांनी स्पष्ट केले. हे पात्र नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोले या दोन स्त्रियांनी संस्कार करून तयार केले आहे, त्यामुळे ते खलनायकी नसून वास्तवाच्या जवळ नेणारे आहे, असेही ते म्हणाले.

नवा ‘खल’प्रवेश : लोकांना आपल्या अभिनयाने खळखळून हसवणारे अभिनेते अतुल परचुरे हे ‘माझा होशील ना’ या मालिकेत खलनायक म्हणून प्रवेश करणार आहेत. ‘जे डी’ असे त्यांच्या पात्राचे नाव असेल. आदित्य कश्यपच्या आई-वडिलांचा मारेकरी आणि आदित्यचा सख्खा काका जयवंत देसाई ऊर्फ ‘जे डी’ हा आता अनेक वर्षांनी मुंबईत परतणार आहे. आदित्य ग्रुपची मालकी मिळवणे आणि ज्या ब्रrोंमुळे संपत्ती आणि कंपनीचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, त्या ब्रrो भावांना देशोधडीला लावणे हे उद्दिष्ट समोर ठेवून हा कपटी, बेरकी आणि क्रूर ‘जे डी’ खलनायक म्हणून मालिकेत रंग भरणार आहे. अतुल परचुरे यांना अशा भूमिकेत पाहणे या प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक असणार आहे.