|| पंकज भोसले

मायकेल विंटरबॉटम हा ब्रिटिश दिग्दर्शक भरमसाट सिनेमे बनवूनही म्हणावा तितका लोकप्रिय चित्रकर्ता नाही. तरीही त्याची वैविध्यपूर्ण विषयांवर चित्रपट बनविण्याची खुमखुमी जोरदार आहे. ‘वेलकम टू सारायेव्हो’ या पत्रकारांवरील चित्रपटानंतर रिपोर्ताजी शैलीतले कित्येक चित्रपट त्याने केले. अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या छळछावणीवर प्रकाशझोत टाकणारा ‘रोड टू ग्वान्तानामो’, पाकिस्तानमधून अनधिकृतरीत्या ब्रिटनमध्ये होणाऱ्या स्थलांतराच्या मार्गावरून नेणारा ‘इन धिस वर्ल्ड’, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या डॅनियल पर्ल या पत्रकाराच्या हत्येच्या घटनेआधीचा तणाव दाखविणारा ‘मायटी हार्ट’ यांची चर्चा बऱ्यापैकी झाली. प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र न घेता त्याने थेट चित्रगृहात प्रदर्शित केलेल्या ‘नाईन साँग्ज’ या चित्रपटात निव्वळ ६९ मिनिटांचा सेक्स आणि रॉकेनरोलचा आविष्कार घडविला होता. गंमत म्हणजे हा चित्रपट वादग्रस्त ठरला तितकाच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये बरीच पारितोषिके मिळवून गेला. डॅनी बॉएलच्या बऱ्याच आधी भारतीय भूमी इथल्या कथा गर्दीने भरलेल्या कोलाहलासह चित्रित करूनही विंटरबॉटमच्या माथी ‘स्लमडॉग मिलिऑनेर’च्या जवळपास जाईल इतके यश लिहिले गेले नाही.

असे असले तरी आवडो किंवा ना आवडो, त्याचा आलेला प्रत्येक नवा चित्रपट आवर्जून पाहण्याजोगा असतो. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेत प्रदर्शित झालेला आणि ऑनलाइन वर्तुळात दाखल झाल्यामुळे नुकताच राधिका आपटेच्या तथाकथित आक्षेपार्ह दृश्यांसाठी चर्चिला जात असलेला ‘वेडिंग गेस्ट’ हा विंटरबॉटमचा चित्रपटही या गोष्टीस अपवाद नाही.

‘वेडिंग गेस्ट’ पाकिस्तानमधून सुरू होतो आणि बहुतांश भारतात घडतो. जयपूर, दिल्ली आणि गोवा या शहरांमधून त्यातल्या व्यक्तिरेखांचा प्रवास चालतो. दोन देशांमधील तणावावर किंवा त्यांच्या सद्य राजकीय संबंधांवर कोणतीही टीका-टिप्पणी करण्याचे जाणीवपूर्वक टाळत, चित्रपट फक्त आपली अपहरण आणि रहस्याची गोष्ट पुढे सुरू ठेवतो.

या चित्रपटाचे नाते दोन प्रकारच्या सिनेप्रकारांशी आहे. त्यातला पहिला म्हणजे न्वार सिनेमा. इथल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखा अजिबातच भल्या नाहीत. धूर्त आणि पैशांपाठी स्वार झालेल्या न्वार सिनेमातील नायक-नायिकेसारखीच त्यांची ओळख घडत जाते. दुसरा चित्रप्रकार कामगिरी पार पाडणाऱ्या भाडोत्री नायकांच्या जवळ जाणारा आहे. ट्रान्सपोर्टरसारख्या अ‍ॅक्शन मालिकांमधल्या हाणामारीक्षम आणि थंड डोक्याने संकटशत्रूंना थोपवत सोबतच्या व्यक्तीला सुरक्षित नेणाऱ्या जेसन स्टेथमसारखी व्यक्तिरेखा इथे तयार करण्याचा प्रयत्न झाला आहे.

चित्रपट सुरू होतो ब्रिटनमधून पाकिस्तानमध्ये रहस्यमयी हेतूने शिरलेल्या आसिफ (देव पटेल) या तरुणापासून. हा तरुण लाहोरमधून वेगवेगळ्या मार्गानी एका शहरगावात दाखल होतो. तेथे सुरू असणाऱ्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आपण आलो असल्याचा बनाव तो रचतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे टेहळणी करून तो स्वत:ला शस्त्र आणि वाहनसज्ज ठेवतो. अल्पावधीतच त्याचे काम पूर्णत्वाला येते. जे असते समीरा (राधिका आपटे) हिच्या अपहरणाचे.

या घटनेला वेगळे नाटय़ लागते, ते समीरा आणि तिच्या ब्रिटनमधील भारतीय प्रेमी यांच्याकरवीच हे अपहरण घडले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर. आता आसिफ नावाच्या (जे खरे असण्याची शक्यता दूरवर) भाडोत्री अपहरणकर्त्यांचे काम निव्वळ समीराला भारतामध्ये पोहोचवून तिच्या मित्रापर्यंत सुखरूप नेण्याचे आणि आपले नियोजित पैसे घेऊन दूर होण्याचे असते. मात्र घटना सरळ घडत नाहीत. समीराच्या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या प्रियकराचे काम लांबते. आसिफने अपहरणादरम्यान अडथळा आणणाऱ्या द्वारपालाच्या हत्येचे वृत्त पाकिस्तान आणि ब्रिटनच्या माध्यमांतून झळकू लागते. त्यामुळे समीराचा प्रियकर घाबरतो. समीराला पुन्हा पाकिस्तानात सोडण्याची गळ आसिफकडे घालू लागतो.

घरदार-देश आणि नावदेखील बदलून निव्वळ प्रेमासाठी आयुष्य पणाला लावलेली समीरा भारतातून पाकिस्तानास जाण्यास नकार देते. आता अपहरण करून सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणाऱ्या आसिफचा जयपूरमधील कालावधी वाढतो. बोगस पासपोर्ट, बदलले जाणारे फोन आणि सीमकार्ड्स यांच्या आधारे तो कुठल्याही यंत्रणांच्या संशयफेऱ्यात न येण्याची तसदी घेतो. ब्रिटनमधील प्रियकर समीराला भेटण्यासाठी भारतात दाखल होतो. मात्र त्याच्या पळपुटय़ा धोरणांनी कातावलेली समीरा त्याच्या ताब्यात असलेल्या मूल्यवान हिऱ्यांची माहिती आसिफला सांगते. पुढे आसिफकडून अपघाताने समीराच्या प्रियकराची हत्या घडते. आसिफइतक्याच थंड डोक्याने समीरा ती हत्या पचवते आणि दोघे पुन्हा आपली ओळख बदलून (हिऱ्यांसह) गोव्याला दाखल होतात. दोघांमध्ये जवळीक तयार होते. पण माफक मजेत परावर्तित झालेल्या या दोघांमधील नातेप्रवासाची दिशा मात्र अनपेक्षित वळणांची ठरते.

चित्रपट सुरुवातीपासून शेवटापर्यंत अनेक गोष्टींमधील रहस्ये उलगडण्याची तसदी घेत नाही. आसिफ आणि समीराच्या पूर्वेतिहासाविषयी जुजबीही माहिती देण्याची येथे गरज वाटत नाही. कारण पारंपरिक वाटेवरून जाणारे इथले कथानक नाही. ते अनुभवण्यासाठी विंटरबॉटमचा हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. बाकी राधिका आपटेला ‘कसे पाहून’ कसे वाटून घ्यावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.