निलेश अडसूळ

अवकाळी पावसानंतर शेतकऱ्यांचं जसं नुकसान होतं, तसं नुकसान यावेळी नाटय़निर्मात्यांचं आणि पर्यायाने संपूर्ण नाटय़सृष्टीचं झालं आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन महत्त्वाच्या दिवशी प्रत्येक नाटकाचे दिवसाला दोन प्रयोग होत असतात. एका प्रयोगाला किमान लाखभर रुपये खर्च येतो. त्यामुळे ३१  मार्चपर्यंत होणाऱ्या नुकसानीचा आकडा हा २० ते २५ लाखांच्या घरात आहे. विशेष म्हणजे उद्या नाटक आहे आणि आज तयारीला लागलो असं होत नाही. ‘प्रयोगाच्या महिनाभर आधी पूर्वतयारी झालेली असते आणि ही गुंतवणूक मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे झालेलं नुकसान भरून निघणं कठीण आहे. यावर काही तोडगा काढता येईल का किंवा आर्थिक नुकसान कसे भरून काढले जाईल यासंदर्भात लवकरच शासनाशी संवाद साधला जाईल. हे प्रकरण निवळल्यानंतर शासनाने निर्मात्यांना आर्थिक मदत करावी अशी आमची विनंती आहे’, असे नाटय़निर्माता राहुल भंडारे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण लवकर निवळेल अशी आशा आहे, कारण मार्च-एप्रिल-मे हा खऱ्या अर्थाने नाटकांचा हंगाम मानला जातो. नेमकं याचवेळी अशी आपत्ती आली तर निर्मात्यांवर उपासमारीची वेळ येईल. ‘निम्मा शिम्मा राक्षस’चा सध्या महाराष्ट्र दौरा होता तोही रद्द करावा लागला. ३१ मार्चपर्यंत प्रकरण आटोक्यात आले नाही तर मात्र परिस्थती गंभीर होईल, असे भंडारे यांनी स्पष्ट केले.

तर घडलेली गोष्ट टाळणं कुणाच्याही हातात नाही. किंबहुना ही टाळण्यासारखी नाही. परंतु शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी याचे गांभीर्याने पालन व्हायला हवे. ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकाचा अमेरिकेतील दौरा रद्द झाला. काही चित्रपट प्रदर्शित झाले आणि ही स्थगिती आली. यामध्ये केवळ नाटकांचे किंवा चित्रपटांचे नाही तर संपूर्ण कलासृष्टीचे नुकसान होणार आहे. याचाच अंदाज घेऊन ‘विजेता’ हा माझा सिनेमाही पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे अभिनेता सुबोध भावे याने सांगितले. नाटक बंद झाले की केवळ कलाकार आणि निर्मात्यांच नुकसान होत नाही. इतरही अनेक जण यावर अवलंबून असतात, याची जाणीव कलाकारांना आहे. नाटकाच्या बाबतीत सांगायचे झाले तर काही तंत्रज्ञ किंवा बॅकस्टेजच्या कलाकारांचे कुटुंब हे प्रत्येक प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवर चालते. काही बॅकस्टेजचे कलाकार दिवसाला दोन ते तीन प्रयोग करतात. आता प्रयोगच बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु हे अधिक काळ लांबले तर यावर तोडगा काढण्यासाठी संपूर्ण कलासृष्टी नक्कीच एकत्र येईल, असेही त्याने सांगितले.

नाटय़गृहेच बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला असल्याने केवळ नाटकांचे प्रयोग रद्द झाले नाहीत, तर बऱ्याच नाटकांचे प्रयोग हाऊसफुल्ल होते, प्रेक्षकांनी तिकिटे काढली आहेत. त्यामुळे निर्मात्यांसोबत प्रेक्षकांचेही पैसे अडकले आहेत, ही देखील बाब लक्षात घेतली पाहिजे. यासंदर्भात बोलताना, ‘नुकसान झालं हे खरं असलं तरी ती उद्याची गरज आहे. ज्यांच्या तारखा गेल्या आहेत, त्यांना पुन्हा तारखा मिळतील. त्यासाठी कोणतेही नवीन पैसे आकारले जाणार नाहीत. कालपासून मी अनेक निर्मात्यांशी बोललो, परंतु कुणीही याबद्दल तक्रार किंवा नाराजी व्यक्त केली नाही. रंगभूमीने ही बाब सकारात्मकतेने स्वीकारली आहे, हेच आपुले वैशिष्टय़’, अशी भावना यशवंत नाटय़मंदिरचे व्यवस्थापक सुनील कदम यांनी व्यक्त केली.

करोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने काही नाटकांचे परदेश दौरेही रद्द करण्यात आले आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा दक्षिण आफ्रिकेतील दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र आर्थिक तोटा ही एकमेव काळजीची गोष्ट नाही, असे अभिनेता-निर्माता प्रशांत दामले यांनी स्पष्ट केले. या आजाराची काळजी करण्याऐवजी भीती निर्माण झाली ही बाब जरा खटकते. अशावेळी प्रेक्षकांची मानसिकता बदलून पुन्हा नाटक रंगभूमीवर उभं करणं हे आर्थिक तोटय़ापेक्षा कठीण आहे, असे ते म्हणतात. आणि नफ्या-तोटय़ाची गणितं सुरूच राहतात, पण आपल्या माणसांचं स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. नुकसान झालं आहे हे सत्य असलं, तरी अशा वेळी वैयक्तिक आर्थिक तोटय़ाचा मुद्दा समोर आणणे योग्य नाही, असेही दामले यांनी सांगितले.

करोनाचा फटका हा केवळ नाटक आणि शोज यांनाच बसला आहे, असे नाही तर त्याचे पडसाद छोटय़ा पडद्याच्या कामकाजावरही उमटले आहेत. त्यांना ताबडतोब चित्रीकरण करणे थांबवणे शक्य नसल्याने आवश्यक ते सावधगिरीच्या  उपाययोजना अमलात आणून चित्रीकरण केले जात आहे. ‘सरकारकडून शुक्रवारीच निर्देश आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. केवळ मराठीपुरता हा विचार न करता यावर व्यापक स्तरावर काय करता येईल यासाठी आमचे तज्ज्ञ काम करत आहेत. सध्या कलाकार, तंत्रज्ञ आणि पर्यायाने प्रत्येकाचीच प्रकृती महत्त्वाची आहे’, असे मराठी मनोरंजन वायकॉम १८ चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी सांगितले. करोनामुळे मालिकांच्या सेटवर कलाकारांच्याच नव्हे तर स्पॉटबॉयपासून चित्रीकरणाच्या ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येकासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत. यामध्ये सॅनिटायझर, टिश्यू पेपर, परिसराची स्वच्छता राखण्यावर वाहिन्यांनी भर दिला आहे.

नुकत्याच झालेल्या ‘झी मराठी’ वाहिनीच्या नामांकन सोहळ्यातही हे उपाय करण्यात आले होते. सोहळ्यासाठी आलेल्या कलाकार आणि मान्यवरांना सॅनिटायझर वापरण्याची सक्ती केली होती. तसेच ‘थर्मामीटर गन’चाही यावेळी वापर करण्यात आला. तापमान तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या या यंत्रातून प्रत्येक कलाकाराची चाचणी केली गेली. तर अशाच पद्धतीची काळजी मालिकांच्या सेटवरही घेण्याचा निर्णय झी मराठीने घेतला आहे. सेटवर वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझर वापरणे सक्तीचे केले असून, परिसराच्या स्वच्छतेबाबतही दक्षता घेतली जात आहे. विशेष म्हणजे प्रकृती बरी नसल्यास किंवा खोकला, सर्दी, ज्वर जाणवत असल्यास रजा घेऊन त्यावर निदान करण्याचेही आवाहन चित्रीकरणातील संपूर्ण संचाला वाहिनीकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कलासृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव’ आणि ‘नाटय़ गौरव’ पुरस्कार सोहळ्यातही बदल करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. १३ मार्चला होणारा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. अद्याप तारीख स्पष्ट झाली नसली तरी दोन वेगवेगळ्या तारखांना होणारे हे दोन दिमाखदार सोहळे एकाच दिवशी पार पडणार आहेत. शिवाय शासनाचे निर्देश असल्याने दरवर्षीप्रमाणे सामान्य नागरिकांना यात सहभागी होता येणार नाही. यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. परंतु मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण आणि पुरस्कार वितरणाचे चित्रीकरण वेगवेगळ्या दिवशी केले जाईल. तसेच यंदाचा सोहळा केवळ कलाकार, मान्यवर आणि आमंत्रितांसाठीच असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या निरोगी आरोग्यासाठी हे बदल करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

करोनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण एका प्रयोगाचे गणित साधारण लाखभराच्या घरात आहे. त्यामुळे एकूण नुकसानीचा अंदाज आपण बांधू शकतो. पण आता परिणामापेक्षा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नागरिकांनी याबाबत भीती न बाळगता ती घ्यावी आणि सुदृढ राहावं.

सुबोध भावे

‘स्टार प्रवाह’वरील कोणत्याही मालिकांचं शूट अजून थांबलेलं नाही. शूटिंग थांबवण्याची वेळ आलीच तर त्यावर पर्यायी उपाय केले जातील. आर्थिक नुकसानीपेक्षा तब्येत महत्त्वाची असल्याने सध्या त्याचा विचार करणे अयोग्य आहे. परिस्थिती आटोक्यात आली की त्यानंतर सर्व सुरळीत होईलच, पण सध्याच्या घडीला सुरक्षा महत्त्वाची. सेटवर प्रत्येकाची काळजी घेतली जाते आहे. स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना होत आहेत.

सतीश राजवाडे