सेलिब्रिटी हा कायम चाहत्यांच्या चर्चेत राहणारा विषय आहे. त्यामुळे अनेकदा सेलिब्रिटींची लाइफस्टाइल आणि त्यांच्याविषयी एकंदरीतच सारं काही जाणून घेण्याची चाहत्यांना कामच उत्सुकता असते. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी चर्चेत आहे. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून वामिका असं तिचं नाव ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विरुष्काच्या बाळाची चर्चा थांबत नाही,तर आता या जोडीविषयी एक नवीन चर्चा रंगली आहे. विरुष्काच्या घरात काम करण्यासाठी एकही नोकर नसल्याचं माजी क्रिकेटपटू सरनदीप सिंग यांनी म्हटल्याचं ‘स्पोर्टकिड’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
“विराट आणि अनुष्का यांच्या घरात काम करण्यासाठी एकही व्यक्ती किंवा नोकर नाही. विरुष्का स्वत: आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करतात. त्यांच्यासाठी खास जेवणाचं ताट वाढतात. विराट कायमच साऱ्यांसोबत गप्पा मारण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी तयार असतो”, असं सरनदीप सिंग म्हणाले.
View this post on Instagram
पुढे ते म्हणतात, “विराट डाऊन टू अर्थ आहे. मैदानातील त्याची खेळी आणि स्वभाव यामुळे अनेकांनी त्याच्याविषयी गैरसमज केला आहे. मैदानात असताना त्याच्यावर संपूर्ण भारतीय संघाची जबाबदारी असते, त्यामुळे अशावेळी तो आक्रमक होणं सहाजिक आहे. परंतु, मैदानाबाहेर तो अतिशय वेगळा आणि शांत आहे.”
दरम्यान, विराट आणि अनुष्का ही चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय जोडी आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. तिच्या बाळाचं नाव त्यांनी वामिका असं ठेवलं आहे.