यंदाचं हे वर्ष बऱ्याच सेलिब्रिटींच्या आयुष्यात आनंद आणणारं ठरणार आहे. त्यांच्या आनंदाचं कारणंही तसंच आहे. करिअर, कलाविश्व आणि खासगी आयुष्यात स्थैर्य लाभलेले काही कलाकार त्यांच्या जीवनातील चिमुरड्यांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. कलाविश्वाच्या झगमगाटापासून गेला काही काळ दूर असलेल्या या कलाकारांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनाला जास्त प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं होतं. या सर्व झगमगाटापासून दूर राहिलेल्या चेहऱ्यांमध्ये अभिनेत्री सोहा अली खान, सेलिना जेटली, पूजा शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. सध्या या अभिनेत्री त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर असून येणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहात आहेत. याच अभिनेत्री आणि सेलिब्रिटी जोडप्यांवर आपण एक नजर टाकणार आहोत.

इशा देओल आणि तिचा पती भरत तख्तानी सध्या होणाऱ्या बाळासाठी फारच उत्सुक आहेत. बेबी बम्पसोबतचे इशाचे फोटो सोशल मीडियावरही बरेच चर्चेत आले होते. इशा बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. २०१२ मध्ये तिने व्यावसायिक भरत तख्तानीसोबत विवाहबद्ध होत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली होती.

esha-deol-1

नवाबी कुटुंबातील अभिनेत्री सोहा अली खानलासुद्धा मातृत्त्वाची चाहूल लागली आहे. नुकताच तिचा बेबी शॉवरही झाला. त्यावेळी सोहाने सुरेख गुलाबी रंगाची साडी नेसली होती. ट्विटरवरुन तिने हे फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता. सोहाने बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेता कुणाल खेमूसोबत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला होता.

sohaa1

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा शर्मासुद्धा गरोदर आहे. सोशल मीडियावर पूजाने तिच्या बेबी शॉवरचे फोटोही पोस्ट केले होते. ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

puja2

बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली अभिनेत्री सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. सोशल मीडियावर सेलिनाचे गरोदरपणातील फोटो बरेच चर्चेत आले आहेत. सध्याच्या घडीला ती पाच वर्षांच्या जुळ्या मुलांची आई असून व्हिस्टन आणि विराज अशी तिच्या मुलांची नावं आहेत.

celena1