सध्या रूपेरी पडद्यावर रिमेकचा जमाना आहे. अधूनमधून दाक्षिणात्य किंवा हॉलीवूड किंवा अन्य कुठल्या तरी सिनेमांचे हिंदी रिमेक येत असतात. खरेतर अन्य भाषांतील गल्लापेटीवर यशस्वी ठरलेल्याच चित्रपटांचा रिमेक करून हिंदीच्या रुपेरी पडद्यावर गल्ला जमवायचा इतका सरळ उद्देश या चित्रपटांचा रिमेक करण्यामागे असतो. डब करण्यापेक्षा रिमेक करणे अधिक प्रभावीही ठरते. परंतु, अशा रिमेकचे विषय तद्दन अतिरंजित, अ‍ॅक्शन आणि तथाकथित दाक्षिणात्य कथनशैली आणि स्टार कलावंतांच्या विशिष्ट स्टाइल दर्शविणारे मसालापटच अधिक असतात. ‘दृश्यम’ हा हिंदीत चौथ्यांदा रिमेक झालेला चित्रपट मात्र याला अपवाद ठरतो. मूळ चित्रपट सुरुवातीला मल्याळम नंतर तेलुगू, कन्नड आणि या वर्षी हिंदी व तामिळ अशा भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. यशसिद्ध फॉम्र्युला म्हणून हिंदीत ‘दृश्यम’ करण्यात आला असला तरी कथानक हाच या चित्रपटाचा आत्मा आहे. अतिशय प्रभावी पटकथा आणि त्याला अनुसरून संवादलेखन, संगीत, पाश्र्वसंगीत असलेला हा ‘क्राइम थ्रिलर’ प्रकारचा चित्रपट आहे.
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच एक दृश्य म्हणजेच एक व्हिडीओ क्लिपपासून चित्रपट सुरू होतो, एका मध्यमवर्गीय माणसाचा अनाकलनीय घटनेतून आपल्या कुटुंबीयांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न अशा स्वरूपाचा चित्रपट असूनही प्रेक्षकांचे रंजन करण्याबरोबरच अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उभे करणारा हा चित्रपट प्रत्ययकारी पद्धतीने पडद्यावर उलगडत जातो.
गोव्याच्या ग्रामीण भागातील एका गावात राहणारा विजय साळगावकर हा चौथी शिकलेला मध्यमवयीन कुटुंबवत्सल माणूस केबलचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असतो. उदरनिर्वाह करून टीव्हीवर सतत चित्रपट पाहण्याची दांडगी हौस विजय साळगावकरला आहे. एका छोटय़ा गावात राहत असताना तिथले एखादे हॉटेल, तिथले पोलीस ठाणे, गावातील अन्य लोक यांचा एकमेकांशी सहजच परिचय असतो. त्याचाही उत्तम वापर कथानकामध्ये लेखकाने केला आहे. विजय साळगावकर, त्याची बायको नंदिनी, त्यांच्या दोन मुली असे कुटुंब मजेत राहत असते. नववी-दहावीत शिकणाऱ्या मोठय़ा मुलीच्या बाबतीत एक घटना घडते आणि त्यानंतर विजय आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य बदलून जाते.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात अकल्पित घटना घडल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी किंवा अकल्पित संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीने विचार करतो आणि कळत-नकळत गुन्हा घडतो. यातून आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी नायक विजय काय काय करतो त्याची ही प्रत्ययकारी कहाणी ‘दृश्यम’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाला अनुसरून एक दृश्य एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून नायकाच्या मुलीला दाखविण्यात येते. त्याने अंतर्बाह्य़ हादरून गेलेली ही मुलगी, तिची आई यांच्याकडून घडलेले कृत्य, त्यामुळे पोलिसांच्या, कायद्याच्या कचाटय़ातून त्यांना वाचविण्यासाठी नायक विजय पुढे ज्या क्लृप्ती लढवितो त्याचे एकामागून एका दृश्यांतून चित्रपट प्रत्ययकारी पद्धतीने उलगडतो. हे नैतिक की अनैतिक, सर्वसामान्य माणसाची घुसमट, त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने उचललेली पावले त्याला कोणत्या दिशेने घेऊन जाऊ शकतात हे चित्रपटातून मांडले आहे. रूढार्थाने नायक-खलनायक, गुन्हा घडल्यानंतर तो लपविण्यासाठी गुन्हेगाराने केलेल्या क्लृप्ती आणि कच्चे दुवे राहिल्यामुळे त्याचे पकडले जाणे, त्याला शिक्षा होणे असे न दाखविता चित्रपट खूप वेगवेगळ्या मुद्दय़ांवर भर देत असल्यामुळेच तो प्रभावी ठरतो.
मध्यंतरापर्यंत विजय साळगावकर आणि त्याचे कुटुंबीय, विजयचे नेहमीचे विश्व दाखविण्यात बराच वेळ खर्ची पडला आहे. सुरुवातीचे धिमे कथानक मध्यंतरानंतर वेग घेईपर्यंत प्रेक्षक काहीसा कंटाळण्याची शक्यता आहे. परंतु, अजय देवगणने साकारलेला विजय साळगावकर, त्याला कायम पाण्यात पाहणारा पोलीस अधिकारी गायतोंडेच्या भूमिकेतील कमलेश सावंत, विजय साळगावकरचा खोटेपणा उघड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या आयजी मीरा देशमुखच्या भूमिकेतील तब्बू, मीरा देशमुखचा नवरा प्रभाकरच्या भूमिकेतील रजत कपूर यांनी आपल्या अभिनय सामर्थ्यांच्या जोरावर चित्रपटाचा तोल सांभाळला आहे.
दृश्यम
निर्माते – कुमार मंगत पाठक, अजित अंधारे, अभिषेक पाठक
दिग्दर्शक – निशिकांत कामत
कथा – जितू जोसेफ, सिकंदर मान (बहादूरगड)
पटकथा – संवाद – उपेंद्र सिधये
संगीत – विशाल भारद्वाज
पाश्र्वसंगीत – समीर फातर्पेकर
छायालेखक – अविनाश अरुण
संकलक – आरिफ शेख
कलावंत – अजय देवगण, श्रीया सरण, तब्बू, रजत कपूर, बालकलाकार इशिता दत्ता, प्रथमेश परब, हिमांशू जोशी, बालकलाकार मृणाल जाधव, कमलेश सावंत व अन्य.