बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार चाहत्यांना सरप्राइजवर सरप्राइज देत आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षयने ‘हाऊसफुल ४’ चित्रपटातील अतरंगी लूक सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना एक सरप्राइज दिले होते. आता अक्षय कुमारने आणखी एका चित्रपटातील लूक शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमारने साडी नेसली आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अक्षय कुमारने शेअर केलेला हा फोटो त्याचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ मधील आहे. हा चित्रपट ‘कंचना २’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. नवरात्रीच्या निमित्ताने अक्षय कुमारने लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील हा लूक प्रदर्शित केला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अक्षय कुमारने लाल रंगाची साडी नेसली असून कपाळी कुंकू आणि हातात लाल बांगड्या घातल्या आहेत. ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात अक्षय कुमार एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अक्षयचा हा लूक पाहून तो भूमिकेला योग्य न्याय मिळवून देईल असे म्हटले जात आहे.

अक्षयने एका पुरस्कार सोहळ्यात ‘भुलभुल्लैया’सारखा एखादा चित्रपट पुन्हा करता यावा अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून तो अशा धाटणीच्या संहितेच्या शोधातही होता. अखेर त्याला ‘लक्ष्मी बॉम्ब’ ची कथा आवडली आणि त्याने लगेच होकार कळवला.

आणखी वाचा : अक्षयचा ‘हाऊसफुल ४’ वादाच्या भोवऱ्यात

या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. या चित्रपटात अक्षयसह अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खिलाडी कुमार हा एक असा अभिनेता आहे ज्याने आतापर्यंत अॅक्शन, विनोदी, गंभीर, प्रेमकथा अशा प्रत्येक धाटणीच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. त्याचे हे वेगवेगळे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयची भूमिका अत्यंत वेगळी आहे हे पोस्टर पाहूनच लक्षात येते. हा लूक पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.