अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा बॉक्स ऑफीसवर रोज नवीन नवीन विक्रम करत आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना होण्याआधीच हा सिनेमा २०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. या सिनेमामधील ‘हाउज द जोश’ हा संवाद तर सामान्यांपासून बीसीसीआयपर्यंत आणि अभिनेत्यांपासून नेते मंडळींपर्यंत सर्वांच्याच तोंडी बसला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने हा सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे. असं सगळं असतानाच हा सिनेमा निर्माण करण्यामागील खऱ्या कारणाचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आदित्य धार यांनी केला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना धार यांनी उरी हा सिनेमा बनवण्याची कल्पना कशी डोक्यात आली याबद्दलचा खुलासा केला आहे. २०१६ साली धार हे ‘रात बाकी’ या सिनेमाचे काम करत होते. या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेसाठी अभिनेत्री कतरीना कैफ आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांची निवड करण्यात आली होती. मात्र उरी येथे भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली. त्यामुळे फवादने या सिनेमामधून काढता पाय घेतला आणि धार यांचा हा सिनेमा अपूर्णच राहिला. मात्र यामुळे खचून न जाता ज्या कारणाने आपला सिनेमा झाला नाही त्यामधूनच विषय शोधून धार यांनी ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा सिनेमा बनवला आणि तो बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला.

याबद्दल बोलताना धार म्हणतात, ‘सिने इंडस्ट्रीमध्ये राहून मी एक गोष्ट शिकलो आहे की जर तुम्हाला इथे रहायचे असल्यास कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही ती स्वत:च्या बाजूने वळवून घेतली पाहिजे. मी ‘रात बाकी’ अर्धवट राहिल्यानंतर हेच केले. सर्जिकल स्ट्राइक झाली आणि त्यानंतर पाकिस्तानी कलकारांवर भारतामध्ये बंदी घालण्यात आली. सिनेमा अर्धवट राहिल्याने सिनेमाशी संबंधित प्रत्येकजण दु:खी होता,’ असं धार यांनी सांगितले. मात्र त्याच वेळेस आपण सर्जिकल स्ट्राइकसंदर्भात सिनेमा तयार करण्याचा विचार केला. ‘सर्जिकल स्ट्राइक म्हणजे नक्की काय झाले हे मला जाणून घ्यायचे होते. त्या हल्ल्यामध्ये नक्की काय झाले ही सिनेमासाठी चांगली कथा होऊ शकते असं मला वाटलं. त्यानंतर सगळं पटापट घडतं गेलं आणि आम्ही उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकवर सिनेमा बनवला. सिने क्षेत्रात राहायचे असेल तर तुम्हाला अशाचप्रकारे काम करावं लागतं. इथे राहणं कठीण आहे. तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप स्थिर रहावं लागतं. काहीही झालं तरी तुम्हाला इथे जोश हायच ठेवावा लागतो,’ असं मत धार यांनी नोंदवलं.