‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील ‘हाऊज द जोश’ हा संवाद चांगलाच गाजत आहे. संसदेपासून ते सर्वसामान्यांमध्येही विकी कौशलचा हा संवाद म्हटला जात आहे. त्यामुळे ‘How’s The Josh’ हा केवळ संवाद राहिला नसून ती लोकांची भावना आहे, असं विकी म्हणतो. देशभरातून या संवादाला मिळणारा प्रतिसाद आणि सोशल मीडियावर होणारी चर्चा पाहून विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवर याविषयची एक पोस्ट शेअर केली आहे.

इन्स्टाग्रामवरील या पोस्टमध्ये त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. ‘आता हा फक्त एक संवाद राहिला नाही. कार्यालय, शाळा, कॉलेज, कॅफे अशा विविध ठिकाणांहून देशभरातून मला ‘हाऊज द जोश’ संवादाचे व्हिडिओ मिळत आहेत. यातूनच तुमचं प्रेम व्यक्त होत आहे. उणे तापमानात लढणाऱ्या जवानांपासून ते जिममध्ये घाम गाळणाऱ्यांपर्यंत, कॉन्फरन्स मिटिंगपासून ते लग्न समारंभापर्यंत, ९२ वर्षीय वृद्ध व्यक्तीपासून ते २ वर्षांच्या चिमुकल्यापर्यंत.. सर्वांसाठी ही ओळ म्हणजे एक भावना आहे. ही भावना तितकीच ताकदवान आणि खास आहे. ही गोष्ट मला माझ्या आयुष्यात कायम लक्षात राहणार आहे,’ असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. ‘इस प्यार के सामने तहे दिल से शुक्रिया’ म्हणत विकीने सर्वांचे मनापासून आभार मानले.

भारतीय लष्करानं 2016 मध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. उरीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यावर उरी हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफीसवर कमाईचा २०० कोटींचा टप्पा गाठणार आहे.