अमरावतीच्या शाळेत खिचडी शिजवणाऱ्या बबिता ताडे या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये कोट्यधीश झाल्या. दीड हजार रुपये पगारापासून ते एक कोटी पर्यंतचा त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे. सोनी वाहिनीवरील या कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत बबिता एक कोटींपर्यंत पोहोचल्या. तोपर्यंत त्यांच्याकडे एक लाइफलाइनसुद्धा बाकी होती. ‘एक्स्पर्ट अॅडव्हाइस’ या लाइफलाइनचा वापर करत बबिता यांनी एक कोटी रुपयांच्या प्रश्नाचं अचूक दिलं व ‘केबीसी’च्या अकराव्या पर्वात दुसऱ्या करोडपती होण्याचा मान पटकावला. यानंतर त्या सात कोटी रुपयांच्या प्रश्नाकडे वळल्या. पण या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊनसुद्धा त्या सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्कम जितकी मोठी तितकाच कठीण प्रश्न हा ‘केबीसी’चा नियम तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण बबिता यांनी त्यांच्या ज्ञानाने सर्वांनाच चकीत केलं होतं. त्यांच्या खेळीने बिग बीसुद्धा भारावून गेले होते. सात कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न असा होता की, ‘कोणत्या राज्यातील सर्वात जास्त राज्यपाल भारताचे राष्ट्रपती झाले आहेत?‘ यासाठी राजस्थान, बिहार, पंजाब व आंध्र प्रदेश या चार राज्यांचे  पर्याय देण्यात आले होते. बबिता त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हत्या म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. पण नियमाप्रमाणे शो सोडल्यानंतर स्पर्धकाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगावं लागतं. तेव्हा बबिता यांनी बिहार हा पर्याय निवडला. त्यांनी हे दिलेलं उत्तर अचूक होतं. त्यामुळे अचूक उत्तर देऊनसुद्धा बबिता सात कोटी रुपये जिंकू शकल्या नाहीत.

 

बबिता अंजनगाव सुर्जीतील श्रीमती पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शालेय पोषण आहार शिजवून खाऊ घालण्याचे काम करतात. त्यांचे पती सुभाष ताडे हे याच विद्यालयात शिपाई आहेत. बबिता या पदवीधर आहेत. विवाहानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यांना प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे परीक्षा देता आल्या नाहीत, पण पुस्तकवाचनाची आवड त्यांनी कायम ठेवली. ताडे यांना एक मुलगी,  एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला शिक्षण घेत असून मुलगा अंजनगावातच शिकत आहे.

पुस्तक वाचनाची आवड त्यांना ‘कौन बनेगा’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरणादायक ठरली.  स्पर्धेच्या अकराव्या पर्वात ३२ लाख इच्छुकांपैकी ४ हजार ८०० स्पर्धक पात्र ठरले होते. त्यातील १२० स्पर्धक ऑडिशनसाठी निवडले गेले. त्यातून बबिता यांना ‘हॉट सिट’ वर बसून प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी सहजपणे प्रश्नांची उत्तरे दिली आणि एक कोटींचे बक्षीस जिंकले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is why babita tade did not won 7 crore rupees even after giving right answer in kbc ssv
First published on: 19-09-2019 at 22:58 IST