मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जून घेतलं जातं. मराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटातील भूमिकेची ऑफर प्रियाला मिळाली होती. पण ही ऑफर तिने नाकारली. यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटानंतर मला बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यात चक दे इंडियाचासुद्धा समावेश होता. चित्रपटात एका हॉकी खेळाडूची भूमिका मला देण्यात आली होती. पण ग्रॅज्युएशनचं वर्ष असल्याने मी चित्रपटाला नकार दिला होता. तेव्हा माझ्यासाठी अभ्यास खूप महत्त्वाचा होता. मला माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच मी अभिनयाचं क्षेत्र करिअर म्हणून निवडलं,’ असं प्रियाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चक दे इंडिया’ला बराच वेळ द्यावा लागणार होता त्यामुळे शाहरुखसोबत काम करण्याची संधी हुकली असंही ती म्हणाली. महिला हॉकी संघाच्या प्रवासापासून ते अगदी विश्वचषकावर त्यांचं नाव कोरलं जाण्यापर्यंतचा सुरेख प्रवास या चित्रपटातून दिग्दर्शक शिमीत अमिनने मांडला होता. या चित्रपटामध्ये बॉलिवू़डचा किंग शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.