दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीप सध्या सलमान खान सोबत ‘दबंग ३’ चित्रपटामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात सलमान आणि सुदीपसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर झळकणार आहे. नुकताच ‘दबंग ३’चे प्रमोशन करत असताना किच्चाने ‘कहो ना प्यार है’ चित्रपटानंतर हृतिकचा प्रचंड राग येत असल्याचे म्हटले आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किच्चाला हृतिकसोबत काम करण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर किच्चाने हृतिक रोशनचा प्रचंड राग येत असल्याचा खुलासा केला आहे. ‘जर मी हृतिकसोबत चित्रपटात काम केले तर सेटवर येणारा पहिला व्यक्ती माझी बायको असेल. ती हृतिकची खूप मोठी चाहती आहे’ असे किच्चा म्हणाला.
‘माझ्या पत्नीमुळे मी हृतिक रोशनचा “कहो ना प्यार है” हा चित्रपट पाहिला. मी हा चित्रपट जवळजवळ १० वेळा पाहिला. कारण माझ्या बायकोने मला धमकी दिली होती जर मी तिच्यासोबत चित्रपट पाहायला नाही गेलो तर ती दुसऱ्या कोणत्या तरी मुलासोबत पाहायला जाईल. म्हणून मी प्रत्येक वेळेस तिच्यासोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलो. मी पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा मला तो आवडला. खासकरुन चित्रपटातील हृतिकचा डान्स. पण या चित्रपटानंतर मी कोणाचाच इतका राग केला नाही’ असे पुढे किच्चा म्हणाला. किच्चाचे उत्तर ऐकून सर्वांना हसू आले.
‘दबंग ३’ या चित्रपटात सुदीप खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले असून 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.