‘रईस’ सिनेमात शाहरुख खानने एका दारुचा अवैध्य धंदा करणाऱ्या माणसाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधील एक दृश्य फारच सुरेख चित्रित करण्यात आला आहे. या दृश्यात दारुच्या बाटल्यांवरुन रोड रोलर फिरवताना दाखवण्यात आला आहे. बघण्यात जरी हे दृश्य फार सहज आणि सोपे वाटत असले तरी पण या दृश्याचे चित्रिकरण करताना दिग्दर्शक राहुल ढोलकियाला फार मेहनत घ्यावी लागली होती.

जागरण डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, हे दृश्य वेगळ्या पद्धतीने चित्रित केले गेले आहे. यासाठी विशेष तयारीही करण्यात आली आहे. या दृश्याच्या चित्रिकरणासाठी साधारणतः ६० हजार रिकाम्या बाटल्या मागवण्यात आल्या होत्या. नंतर त्यांना जमिनीवर योग्य पद्धतीने सजवण्यात आले. जर हे दृश्य पहिल्याच टेकमध्ये जर योग्य झाले नसते तर काय करावे लागले असते याचा विचार न केलेलाच बरा. एवढ्या बाटल्या परत मागवणे आणि त्यांना सजवणे सोपे नव्हते. त्यामुळे दिग्दर्शक राहुल ढोलकियाने या दृश्याचे चित्रिकरण करण्याआधी कलाकारांकडून अनेकदा तालीम करुन घेतली आणि जेव्हा सगळे योग्य वाटले तेव्हाच या दृश्याचे चित्रिकरण करण्यात आले.

असे ही म्हटले जाते की, या दृश्याच्या चित्रिकरणासाठी खासकरुन या बाटल्या तयार करण्यात आल्या होत्या. या सिनेमात शाहरुख खान एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘रईस’ हा सिनेमा गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊदच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे, मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला, या भोवती सिनेमाचे कथानक फिरताना दिसणार आहे. शाहरुख खान, नवाझुद्दिन सिद्दिकी, माहिरा खान, मोहम्मद झिशान आयुब यांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.