News Flash

सुटकापट!

हा चित्रपट हॉलीवूडच्या सराईतपणाहून थोडा वेगळा होतो.

हॉलीवूडेतर चित्रपटसृष्टीतला एखादा चित्रपट पाहायला गेलात तर त्यातला प्रमुख फरक असतो, तो प्रेक्षकशरणतेला चित्रकर्त्यांनी हद्दपार केल्याचा. म्हणजे चित्रपटात रंजकतेची सारी मूल्ये अंगभूत असतात. पण तो फारशा दर्शकांना आवडतील अशा चमत्कृतींमध्ये रस घेत नाही. खिळवून ठेवण्यासाठी अधिकची कसबीवृत्ती बाणवत नाही. त्यामुळे चित्रपट हॉलीवूडच्या सराईतपणाहून थोडा वेगळा होतो. ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांची संयुक्त निर्मिती असलेला ग्रेग मॅक्लेन दिग्दर्शकाचा ‘जंगल’ हा डॅनियल रॅडक्लीफ अभिनीत ताजा सिनेमा याकडे त्याचे चांगले उदाहरण म्हणून पाहता येईल.

योसी गिन्सबर्ग या इस्रायली लेखक-पत्रकाराचे ‘जंगल : ए हॉरॉविंग ट्रू स्टोरी ऑफ सव्‍‌र्हायव्हल’ हे पुस्तक साहसकथा- कादंबऱ्या वाचणाऱ्या वर्गात खूप लोकप्रिय आहे. १९८१ साली योसी गिन्सबर्ग साहसकथांनी भारावलेले, धाडसप्रिय तरुण होते. वाचलेल्या कादंबऱ्यांतील नायकासारखे त्यांना अनुभवसमृद्ध व्हायचे होते. लष्करातून सक्तीची तीन वर्षांची सेवा पूर्ण करून गिन्सबर्ग दक्षिण अमेरिकेत अनुभवकण गोळा करायला आले होते. तेथे त्यांच्यासारख्याच विविध देशांतून आलेल्या समवेडय़ांसोबत ते अमेझॉनच्या दूरतम जंगलातील मानवी वस्ती शोधायला गेले आणि तीन आठवडे त्या जंगलात खोलवर अडकून पडले. त्या जंगलानुभवांवर डिस्कव्हरी वाहिनीने माहितीपट बनविला. जंगल कायद्यावरच्या एका कार्यक्रमात त्यांची मुलाखतही घेतली. आता त्यांच्या पुस्तकावर साहसप्रेमींसोबतच समग्र प्रेक्षकवर्गासाठी ‘जंगल’ हा चित्रपट आला आहे.

या चित्रपटावर जाण्याआधी काही महत्त्वाची साहित्यिक आणि चित्रपटीय उदाहरणे अत्यावश्यक आहेत. कारण या उदाहरणाबरहुकूम चित्रपट घडत असल्यामुळे त्याचे आकलन स्पष्ट होईल. डॅनियल डेफोच्या ‘रॉबिन्सन क्रूसो’ या सतराव्या शतकात निर्जन बेटावर अडकून पडलेल्या वीरोत्तमाची कहाणीच पुढील शतकात वेगळ्या ढंगात विल्यम गोल्डिंग यांनी ‘लॉर्ड ऑफ फ्लाइज’मध्ये मांडली होती. लहान मुलांना सहलीवर घेऊन जाणारे विमान निर्जन बेटावर अडकते. तेथे त्या लहान मुलांचे नवराज्य आणि हिंसा, क्रौर्याची मानवी अंतर्भूत प्रवृत्तीदर्शन होते, अशी गोष्ट त्यात होती. हाच धागा पुढे वाढवत अ‍ॅलेक्स गार्लेण्डच्या ‘द बीच’ या कादंबरीमध्ये थायलंडमधील दुर्गम जंगलात पाश्चिमात्य सुखलोलुप व्यक्तींनी तयार केलेल्या जगाचे चित्रण होते. डॅनी बॉएलने त्यावर केलेला चित्रपट चालला नसला तरी त्याच्या उत्तम सिनेमांपैकी एक आहे. टॉम हँक्स अभिनीत कास्ट अवे चित्रपटात पुन्हा समुद्रावर कित्येक वर्षे अडकलेल्या व्यक्तीचा आधुनिक जगातून आदिमतेकडे जाणारा प्रवास दाखविला आहे. या सगळ्या औद्योगिक क्रांतीनंतरच्या चित्रपट-साहित्यामध्ये भरपूर मोठा फरक असला, तरी साम्य हे निसर्गाच्या अमर्त्य शक्तीच्या दर्शनाचे आहे.

‘जंगल’ चित्रपटातील योसी गिन्सबर्ग हा रॉबिन्सन क्रूसोप्रमाणे आई-वडिलांशी खटके उडून, त्यांनी सांगितलेल्या करिअरमार्गाला धुडकावून सफरीस निघाला आहे. विल्यम गोल्डिंगच्या पुस्तकाबरहुकूम त्याला जंगलामध्ये अनुभवांची शिदोरी मिळायला लागते. ‘कास्ट अवे’ आणि ‘द बीच’ चित्रपटातल्यासारखे एकटेपण आणि त्यामागून तयार होणाऱ्या भासमयी जगाशी सामना करावा लागतो.

चित्रपटामध्ये सुरुवातीलाच स्वित्र्झलडमधील शाळा शिक्षक मार्कस याच्याशी योसीशी (डॅनियल रॅडक्लीफ) मैत्री होते. मार्कसचा अमेरिकी छायाचित्रकार मित्र केव्हिन याच्याशी मार्कसमुळे ओळख होते. बोलिव्हियाच्या शहर पर्यटनामध्ये कार्ल नावाचा ऑस्ट्रियामधील पर्यटक योसीला आधुनिक संस्कृतीपासून लांब असलेल्या जमातीविषयी माहिती सांगतो. योसी आपल्या नव्याने झालेल्या दोघा मित्रांच्या गळी तेथे पर्यटनाला जाण्याचे उतरवतो. हातात असलेला सारा पैसा पणाला लावून ते चौघे चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधील धाडसवीरांसारखे जंगल तुडवू लागतात. मार्कस या प्रवासात थकतो आणि वेदनांनी बेजार झालेल्या पायांमुळे मध्यातूनच कार्लसोबत मागे फिरतो. नकाशा घेऊन योसी आणि केव्हिन प्रवास पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. एका नदीमधील प्रवासात दोघे हरवतात आणि योसी जंगलामध्ये अडकतो.

योसीची जंगलामध्ये एकटेपणा आणि अन्नामुळे होणारी दुर्दशा, त्याची जंगलामध्ये तयार होणारी भ्रामक अवस्था आणि जगण्यासाठीचा संघर्ष याची हॉलीवूडच्या टाळीफेक मनोरंजनाला वगळून केलेली निर्मिती म्हणजे हा चित्रपट. इथे एकदा वाघ योसीला मारण्यासाठी दबा धरून बसलेला दिसतो. मोठय़ा अजगराला योसी मारताना दिसतो. ही दृश्ये नायकाचे उदात्तपण दाखवीत नाहीत इतकी साधारण चित्रित झाली आहेत. इथला सर्वात भीषण प्रकार वाटतो, ते त्याला आपल्यासोबत आदिवासी स्त्री असल्याचा आणि आपण तिचे संरक्षण करीत असल्याचा भास. दहाएक मिनिटांहून अधिक काळ या भासमयी जगामुळे त्याचे जगणे विस्तारले जाते. जंगलाशी एकरूप होताना सर्व संकटांना तोंड देण्यासाठी तो सज्ज होतो.

अर्थात साधम्र्य असल्याचे सांगितलेल्या सर्व कलाकृतींप्रमाणेच ‘जंगल’ हा सुटकापट असला, तरी डॅनियल रॅडक्लीफने योसी गिन्सबर्ग वठवताना भाषेपासून देहबोलीमध्ये जीव ओतल्याचे लक्षात येईल. पॉटरयुगाच्या अस्तानंतर या अभिनेत्याने अनेक चांगल्या भूमिका करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘जंगल’मुळे त्यात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 1:03 am

Web Title: thriller drama jungle movie
Next Stories
1 VIDEO : जेव्हा कपिल शर्मा ‘फिरंगी’ होतो
2 अबब! या लूकसाठी आलियाने मोजली इतकी किंमत?
3 ऐश्वर्यालाही टक्कर देणारी ही सौंदर्यवती आहे तरी कोण?
Just Now!
X