News Flash

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’चे तिकीट दर वाढणार?

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा यशराज प्रॉडक्शनचा आजवरचा सर्वात खर्चीक चित्रपट मानला जातो आहे.

ठग्ज ऑफ हिंदुस्थान

चित्रपटाबाबतच्या उत्सुकतेमुळे आर्थिक फायदा उचलण्याचा प्रयत्न

मुंबई : बिग बजेट आणि बहुचर्चित चित्रपट म्हणून ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’बद्दल उत्सुकता असली तरी या सिनेमाकरिता सिनेरसिकांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे. रसिकांमधील उत्साह आणि चित्रपटाभोवती असलेले वलय याचा फायदा घेत चित्रपटाचे तिकीट दर दहा टक्क्यांनी वाढवणार असल्याची घोषणा यशराज प्रॉडक्शनने केली आहे. याआधी ‘संजू’ चित्रपटाचे तिकीट दरही वाढवण्यात आले होते. मात्र ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या तिकिटांचे दर त्यापेक्षाही जास्त असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

बिग बजेट चित्रपटांसाठी तिकिटांचे दर वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा प्रेक्षकांनी ही दरवाढ अनुभवलेली आहे. सध्या चित्रपटांचा निर्मिती खर्च अवाच्या सवा असतो. पहिल्या तीन दिवसांतच चित्रपट जास्तीत जास्त कमाई करतात. त्यानंतर चित्रपट चांगला चालला तर तो पुढे टिकतो. नाही तर चित्रपटगृहातून त्याच आठवडय़ात उतरवला जातो. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तीन दिवसांतच जास्तीत जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने तिकिटाचे दर वाढवले जातात, अशी माहिती चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी दिली. ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘टय़ूबलाइट’ हे सलमान खानचे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत. मात्र तिकिटांचे दर जास्त असल्याने चित्रपट आठवडाभरच चित्रपटगृहात टिकले तरी त्यांची कमाई चांगली झाली होती.

‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ हा यशराज प्रॉडक्शनचा आजवरचा सर्वात खर्चीक चित्रपट मानला जातो आहे. व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट, महागडे सेट्स असलेल्या या चित्रपटाचे बजेटच २१० कोटी रुपये आहे. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्याने तिकिटांचे दर वाढवण्यात आले आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘संजू’ चित्रपटासाठी मल्टिप्लेक्समध्ये ६०० ते १६०० रुपये तिकिटांचे दर होते. आता ‘ठग्ज.’च्या साध्या तिकिटासाठी कमीत कमी २०० रुपये मोजावे लागणार आहेत. चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगही ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आमिर खानच्या ‘दंगल’, ‘धूम ३’ चित्रपटांसाठीही तिकीट दर वाढवण्यात आले होते.

‘हम आपके है कौन’पासूनची परंपरा

‘शोले’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा तिकिटाचे दर वाढवण्यात आले होते. त्या वेळी बाल्कनीचे तिकीट ५ रुपये ५० पैसे होते. पण खऱ्या अर्थाने १९९४ मध्ये ‘हम आपके है कौन’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तिकिटांचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले. त्या वेळी प्रत्येक शहरातून ठरावीक चित्रपटगृहांतूनच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. इतर वेळी ५०, ६० आणि ७५ रुपये असे तिकिटांचे दर असायचे. मात्र शनिवार-रविवारी हेच दर शंभर रुपयांपर्यंत वाढवले जायचे. त्यानंतर बिग बजेट चित्रपटांसाठी तिकीटदर वाढवण्याची प्रथाच पडून गेली, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:36 am

Web Title: thugs of hindustan ticket rates likely to increase
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : आजूबाजूच्या चांगल्या गोष्टी पाहा
2 संजय दत्त करणार मराठी सिनेमाची निर्मिती
3 सिद्धार्थ-रितेशच्या ‘मर जावा’चं पोस्टर प्रदर्शित