सलमान खानच्या चित्रपटांप्रमाणेच त्याने केलेले वक्तव्यही चर्चेचा विषय ठरतो. सध्याही त्याचे असेच एक वक्तव्य चर्चेत असून, त्यावर ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. या नमित्ताने त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर एका खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. २०१७ मधील सलमानचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने खास ठरला कारण, वाढदिवसाच्या काही दिवसांपूर्वीच ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

‘टायगर…’ला प्रेक्षकांनीही पसंती दिली. त्यामुळे चित्रपटाला मिळालेल्या यशाविषयी सलमाननेही आपले मत मांडले होते. ‘माझे शरीर हे एखाद्या डिझेल इंजिनसारखे आहे. एकदा उर्जा मिळाली तर ते कार्य करत राहते’, असे तो म्हणाला होता. त्याच्या याच वक्तव्याला अधोरेखित करत आनंद महिंद्रा यांनी उत्फूर्त प्रतिक्रिया देत एक ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधले.

महिंद्राच्या XUV500 SUV या कारच्या संदर्भात ट्विट करत महिंद्रा यांनी मोठ्या शिताफीने सलमानचा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटच्या शिर्षकाचा वापर करत ट्विट केले, ‘चित्ता (XUV) जिंदा है…’ सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणजेच चित्त्याला नजरेत ठेवत महिंद्राच्या XUV500 SUV ची निर्मिती करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, जाहिरातींमध्येही या कारला ‘चित्ता’ म्हणूनच संबोधण्यात येते. त्यामुळे महिंद्रा यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरते आहे.

वाचा : पाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल

XUV500 ही SUV सीरिजमधील नेक्स्ट जनरेशन कार असून, भारतातील रस्त्यांच्या अनुशंगानेच तिची बनावट करण्यात आली आहे. या कारच्या नव्या मॉडेलमध्ये २.२ लिटरची क्षमता असणारे डिझेल इंजिन असणार आहे. २०१८च्या ऑटोएक्सपोमध्ये या कारचे अनावरण करण्यात येणार असल्याचे कळते.