|| पंकज भोसले

‘टाइम मशीन’द्वारे कथानकातील व्यक्तिरेखांचा कालप्रवास आखून गमती-जमती घडविणाऱ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची संख्या प्रचंड असली, तरी मनोरंजनासोबत डोक्याला पर्याप्त चालना देणारे चित्रपट तुलनेने कमी आहेत. अजाणतेपणे किंवा अपघाताने टाइम मशीनमध्ये शिरकाव करणाऱ्या व्यक्तीला आपल्या घराभोवती घडत राहणाऱ्या विचित्र गुन्ह्य़ांची मालिका दाखविणारा ‘टाइमक्राइम्स’ (२००७), चार तंत्रज्ञांकडून चुकीने बनलेले यंत्र कालप्रवास घडविणारे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा उचित वापर करण्याचे मार्ग शोधताना घडणाऱ्या घडामोडी नोंदविणारा ‘प्रायमर’ (२००४), टाइम मशीन तयार करून तिचा वापर करताना सहप्रवासासाठी जोडीदार शोधण्याची जाहिरात दिल्यामुळे शोध पत्रकारांच्या संशोधनाचा विषय बनलेला ‘सेफ्टी नॉट गॅरेंटेड’, मानवनिर्मित विषाणूमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याची वर्दी देऊन पुढे येणाऱ्या संकटावर तोडगा काढण्यासाठी पाताळात राहणाऱ्या प्रगत वसाहतीमधून टाइम मशीनच्या मार्गाने मागे येणाऱ्या नायकाची गोष्ट सांगणारा ‘ट्वेल मंकीज’ (१९९५) यासारख्या चित्रपटांनी मनोरंजन देऊनही आपली गोष्ट सांगण्याची पद्धत पारंपरिक ठेवलेली नाही. टाइम मशीनचा वापर करणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखांच्या आकांक्षापूर्ती किंवा कुरघोडीच्या धोपट टाळ्यापिटू कथानकांना टाळून प्रेक्षकाला विचारांचा पुरता थरार देऊ केला. या निवडक टाइम मशीनयुक्त चित्रपटांच्या पंगतीमध्ये काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने आणलेला ‘सी यू यस्टरडे’ नावाचा चित्रपटही सन्मानाने दाखल करावा लागेल. वरवर टाइम मशीनद्वारे कालप्रवासाचा खेळ करणाऱ्या इथल्या व्यक्तिरेखा अमेरिकी समाजातील वंशद्वेशाच्या समस्येवर सहजपणे अचूक टिप्पणी करतात.

कृष्णवंशीय तरुणांच्या मग्रूर पोलिसांकडून होणाऱ्या हत्या आणि त्यानंतर होणारा उद्रेक अमेरिकेत या दशकातील महत्त्वाचा सामाजिक मुद्दा बनला आहे. आकडेवारीनुसार २०१७ मध्ये ११४७ तरुणांची पोलिसांनी केवळ संशयावरून गोळी झाडून हत्या केली असून २०१२ पासून ही आकडेवारी दरवर्षी वाढतच आहे. दर महिन्याला कृष्णवंशीयांवरील अन्यायाच्या घटना बातम्यांच्या विषय होतात (अन् विरोधाभास म्हणजे हॉलीवूडमधील अभिनेत्यांपासून आंतरराष्ट्रीय संगीत जगतावर कृष्णवंशीयांचे वर्चस्व ढळत नाही.). या सामाजिक प्रश्नाचा एक धागा दिग्दर्शक स्टीफन ब्रिस्टोल याने आपल्या टाइम मशीन महत्त्वपूर्ण घटक असलेल्या चित्रपटामध्ये वापरला आहे. तोही प्रचारकी वाटू नये, इतक्या सहजपणे.

‘सी यू यस्टरडे’ सुरू होतो तो दोन चुणूकदार शाळकरी मुलांच्या प्रयोगाद्वारे. सीजे वॉकर (एडन डंकन स्मिथ) आणि सबॅस्टिअन थॉमस (डाण्टे क्रीच्लो) या दोघांनी सॅबॅस्टिअनच्या गॅरेजमध्ये आइन्स्टाइनलाही हयातभर करता आले नाही असे संशोधन आपल्या पौगंडावस्थेतच पूर्ण केलेले असते. या दोघांनी तयार केलेली टाइम मशीन त्यांना दहा मिनिटांच्या कालावधीसाठी एक दिवस पाठीमागे घेऊन जाण्याची क्षमता राखून असते. त्यांचा प्रयोग यशस्वी होतो, त्या आनंदामध्ये सीजे चोवीस तास आधीचा कालप्रवास करून आपल्या माजी प्रियकराची छोटीशी गंमत करते. या गमतीचे पर्यवसान तिच्या माजी प्रियकराच्या अपघातात होते आणि हात मोडलेला प्रियकर तिचा सूड घेण्यास सज्ज होतो. दुसऱ्या दिवशी मात्र घटना भलत्याच घडतात. आपल्या मित्रासोबत भटकत असलेला सीजेचा भाऊ कॅल्विन (अ‍ॅस्ट्रो ब्रॅडली) याला दरोडेखोर समजून पोलीस गोळ्या घालतात. चुकून हत्या झाल्याचे उघड होते, मात्र तोवर कॅल्विनचा मृत्यू झालेला असतो.

आधीच शहरात सुरू असलेल्या कृष्णवंशीय तरुणांच्या हत्यांवरून मोर्चे आणि उद्रेक सुरू होतो. त्यात कॅल्विनच्या मृत्यूने आणखी तेल पडते. मात्र सीजे दु:खाला विसरून आपल्या टाइम मशीनमध्ये आणखी सुधारणा करते. कालप्रवासाची गती वाढविण्याचा प्रयत्न करून ती आपल्या भावाच्या मृत्यूची घटना टाळण्याची योजना आखते.

सबॅस्टिअन आणि सीजे पहिली कालझेप अत्यंत काळजीपूर्वक घेतात. मात्र हात मोडलेल्या माजी प्रियकराच्या अडथळ्यांमुळे त्यांना घटनेच्या जवळ जाण्यास काही सेकंदांचा उशीर होतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच अडथळे येतील, हा अदमास घेऊन भावाच्या मृत्यूस जबाबदार ठरलेला दरोडा टाळण्याचा प्रयत्न हे दोघे करतात. मात्र या कालप्रवासात दरोडेखोरांकडून सबॅस्टिअनची हत्या होते आणि सीजे एकटी पडते. भावाची हत्या टळली असली, तरी गमावलेल्या मित्राला पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी ती टाइम मशीनची क्षमता वाढवून एकटय़ाने कालप्रवास करण्याचा निर्णय घेते. हा मित्र जिवंत होतो, मात्र घटना वेगळेच अनपेक्षित वळण घेऊ लागतात. कालप्रवासादरम्यान विज्ञानाच्या नियमांना मोडण्याचा प्रमाद सीजेकडून झाल्यामुळे त्याचा भरुदड तिला भोगावा लागतो.

या चित्रपटाच्या कथेला अंत नाही, कारण दिग्दर्शकाला या निमित्ताने मांडायच्या सामाजिक प्रश्नालाही कायमस्वरूपी अंत नाही. या शाळकरांनी मुलांनी विज्ञानचर्चा आणि प्रयोगांसह वठविलेल्या सुंदर भूमिका, त्यांच्या बाळबोध वाटणाऱ्या यंत्रांतून होणारी कमाल आणि चित्रपटातील निवडक घटनांचा तोच खेळ पुन:पुन्हा पाहताना कालप्रवासाचा पुरेपूर थरार प्रेक्षकाला लाभतो.