एका सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत, नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली मेहनत आणि अभिनयाच्या अनोख्या शैलीने बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनय कौशल्यामुळे तो चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. स्वत:च्या मेहनतीने ध्येय साध्य करणाऱ्या नवाजुद्दीनने कोथिंबीर विकण्याचे कामदेखील केले होते. कोथिंबीर विकून १०० रुपयांवरून ३०० रुपये कमावण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या जीवनाशी निगडीत अनेक किस्से सांगितले. मीरा रोड येथे राहत असताना पैसे कमावण्यासाठी आपण कोथिंबीर विकल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे भाजी कसे विकतात हे माहित नसल्याने आपल्याकडचे सर्व पैसेसुद्धा गमवावे लागल्याचे नवाजुद्दीनने सांगितले. ‘माझ्या एका मित्राने २०० रुपयांची कोथिंबीर विकण्यासाठी आणली. कोथिंबीरची एक जुडी पाच रुपयांनी विकायला त्याने सुरूवात केली आणि थोड्या वेळाने ती कोथिंबीर काळी पडू लागली. त्यामुळे ती कोणी विकतही घेत नव्हते. आम्ही दोघे पुन्हा ज्याच्याकडून कोथिंबीर विकायला आणली तिकडे गेलो. तू दिलेली कोथिंबीर काळी पडू लागल्याने कोणीच विकत घेत नसल्याचे त्याला सांगितले. तेव्हा कोथिंबीरवर पाणी शिंपडत राहावे लागते नाहीतर ती काळी पडते असे त्याने आम्हाला समजावले. आमच्याकडे असलेल्या सर्व पैशांनी ती कोथिंबीर विकत घेतल्याने घरी जाताना आम्हाला विनातिकिट ट्रेनमधून प्रवास करावा लागला,’ असे नवाजुद्दीनने सांगितले.

nawazuddin-2

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जेव्हा नवाजुद्दीनला फार कोणी ओळखत नव्हते तेव्हाचाही एक गमतीशीर किस्सा त्याने यावेळी सांगितला. नवाजुद्दीनने सांगितले की,’२०१२ मध्ये कान चित्रपट महोत्सवामध्ये माझे दोन चित्रपट निवडले गेले. त्यामुळे एका मोठ्या डिझायनकडे जाऊन कान महोत्सवमध्ये घालण्यासाठी मस्त सूट शिवायला सांगितले. त्या डिझायनरने आधी खालून वरपर्यंत मला निरखून पाहिले. हा अभिनेत्यासारखा तर दिसत नाही मग याचा चित्रपट कसा निवडला गेला असे त्याला वाटले असेल म्हणून त्याने सूट बनवून देण्यास नकार दिला.’

वाचा : ‘ट्युबलाइट’नंतर आता शाहरूखचा ‘जब हॅरी मेट सेजल’सुद्धा हॉलिवूडमधून केलाय कॉपी?

पुढे त्याने सांगितले की, ‘मला लवकर जायचे असल्याने घराजवळील एका लोकल मार्केटमधील टेलरकडून मी सूट शिवून घेतला आणि तोच सूट घालून मी कान चित्रपट महोत्सवाला गेलो. जेव्हा पुढच्या वेळेस लंच बॉक्स, मानसून शूटआऊट आणि बॉम्बे टॉकीज हे तीन चित्रपट कान महोत्सवासाठी निवडले गेले तेव्हा अनेक डिझायनर स्वत: माझ्याकडे येऊन कपडे डिझायन करून देतो म्हणाले. तेव्हा मी तो जुनाच सूट घालून जाईन असे त्यांना सांगितले.’

कठोर परिश्रम घेत, साधेपणाने जगत नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आता सेलिब्रिटी झाल्यानंतरही नवाजुद्दीनने आपले साधारण व्यक्तिमत्त्व आणि समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची जिद्द अजूनही सोडलेली नाही.