माव्‍‌र्हल अ‍ॅव्हेंजर्सच्या माध्यमातुन सुपरहिरो मनोरंजन क्षेत्रात निर्णायक आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ हातावर हात धरुन बसेल हे काही शक्य नाही. परंतु डीसीची सध्य परिस्थिती पाहता ‘अ‍ॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ इतका मोठा सुपरहिरोपट तयार करण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे यावर पर्याय म्हणुन दिग्दर्शक ‘ख्रिस्तोफर नोलान’ मार्फत ‘बॅटमॅन’वरच पुन्हा एकदा गुंतवणुक करण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे.

बॅटमॅनमधील मुख्य खलनायक ‘जोकर’ या व्यक्तिरेखेसाठी अभिनेता ‘टॉमी वसु’ची निवड करण्यात आली आहे. याआधी ही भुमिका ‘हीथ लेजर’ने साकारली होती. ख्रिस्तोफर नोलान मार्फत दिग्दर्शीत झालेला आणि हीथ लेजरने पडद्यावर साकारलेला ‘जोकर’ हा हॉलिवुड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट खलनायकांपैकी एक म्हणुन ओळखला जातो. ऑस्कर पुरस्कार आणि अफाट लोकप्रियता मिळवणाऱ्या जोकरवर डीसीला पुढे अनेक प्रयोग करायचे होते. परंतु हीथ लेजरच्या अचानक झालेल्या निधनाने त्यांना ते शक्य झाले नाही. सध्या त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी माव्‍‌र्हल सातत्याने त्यांच्या पुढे जात असल्यामुळे त्यांची बरोबरी करण्यासाठी बॅटमॅनशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे डीसीचा सर्वात लोकप्रिय सुपरहिरो बॅटमॅनमरवच त्यांनी पुर्नगुंतवणुक करण्यास सुरवात केली आहे.

या चित्रपटाचे नाव किंवा पटकथा अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु जोकरच्या रेखाटनास मात्र सुरवात झाली आहे. कोणत्याही सुपरहिरोपटात खलनायकाची भुमिका ही अत्यंत महत्वाची समजली जाते. कारण खलनायक जितका मोठा तीतकाच त्याला मारणारा हिरो मोठा. त्यामुळे बॅटमॅनमधील मुख्य खलनायनायकाच्या भुमिकेसाठी ‘टॉमी वसु’ची झालेली निवड योग्य आहे का? यासंदर्भात चाहत्यांकडुन शंका उपस्थित केली जात आहे.

या चित्रपटाचा मुख्य दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान हा सिनेसृष्टीतील सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक म्हणुन ओळखला जातो. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत नोलानचा डंकर्क हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत होता. परंतु जबरदस्त अनुभव आणि सर्जनशिलता असतानाही ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ची दिवसेंदिवस बिघडत जाणारी परिस्थीती नोलान ‘बॅटमॅन’मार्फत पुर्वपदावर आणु शकेल का? हे जाणुन घेण्यासाठी सुपरहिरो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे.