सध्याच्या काळात टीव्ही, चित्रपटगृहांची जागा आता ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे. अनेक चित्रपट, वेब सीरिज सध्या ओटीटीवर प्रदर्शित होताना दिसतात. त्यामुळे तरुणाईचा कलदेखील याच माध्यमाकडे जास्त आहे. त्यातच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स, डिझ्नी हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5, एमएक्स प्लेअर असे अनेक नवे ओटीटी प्लॅटफॉर्मचे पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र यापैकी अ‍ॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्सकडे प्रेक्षकांचा कल अधिक असल्याचं पाहायला मिळतं. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर कंटेट क्वालिटी आणि कथा सादर करण्याची पद्धत प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे सध्या अ‍ॅमेझॉन प्राइमवर गाजत असलेल्या वेब सीरिज कोणत्या त्या जाणून घेऊयात.

१. मिर्झापूर –

अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रचंड गाजलेली सीरिज म्हणजे मिर्झापूर. या सीरिजमधील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकला असून मराठमोठी अभिनेत्री श्रेया पिळगांवकरदेखील या सीरिजचा एक भाग असल्याचं दिसून येतं. १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेली ही सीरिज आजही अनेक जण तितक्याच आवडीने पाहतात. क्राइम थ्रिलर प्रकारात मोडणाऱ्या या सीरिजमध्ये काही बोल्ड सीन आणि शिवराळ भाषेचा वापर करण्यात आला आहे. करण अंशुमन आणि गुरमीत सिंह यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तर फरहान अख्तर आणि रितेश सिदवानी यांच्या एक्सल एन्टरटेन्मेंटने निर्मिती केली आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी, दिव्येंदु शर्मा, राजेश तेलांग, अली फजल, श्वेता त्रिपाठी ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकली आहेत.

२. द फॅमिली मॅन –

अ‍ॅमेझॉन प्राइमवर गाजलेल्या सीरिजपैकी एक सीरिज म्हणजे द फॅमिली मॅन. जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडणारा अभिनेता मनोज बाजपेयी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकला आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत ही सीरिज लोकप्रिय झाली आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या टॉप ५ सीरिजमध्ये द फॅमिली मॅनचं आवर्जुन उल्लेख केला जातो.

३ इनसाइड एज –

अ‍ॅमेझॉन प्राइमवरील पहिली भारतीय वेब सीरिज म्हणून इनसाइड एजकडे पाहिलं जातं. ही सीरिज भारताप्रमाणेच विदेशातही लोकप्रिय ठरली. करण अंशुमन यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरिज स्पोर्ट्स ड्रामा प्रकारात मोडते. यात अंगद बेदी, विवेक ओबेरॉय, ऋचा चड्ढा, तनुज विरानी, सिद्धांत चतुर्वेदी, आमिर बशीर आणि सपना पब्बी महत्त्वपूर्ण भूमिकेत इनसाइड एजचा पहिला सीजन १० जुलै २०१७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ६ डिसेंबर २०१९ मध्ये त्याचा दुसरा सीजनदेखील प्रदर्शित झाला.

४. पाताल लोक –

या सीरिजच्या माध्यमातून अभिनेत्री अनुष्का शर्माने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या हाऊस क्लीन स्लेट फिल्म्स या प्रोडक्शनअंतर्गत या सीरिजची निर्मिती झाली आहे. तर अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात प्रदर्शित झालेल्या या सीरिजने तुफान लोकप्रियता मिळविली आहे. जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज काबी, इश्वाक सिंह, स्वस्तिका मुखर्जी आणि अभिषेक बॅनर्जी हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. तरुण तेजपाल यांच्या The Story of My Assassins वर या सीरिजची कथा आधारित आहे.

५. बंदिश बॅडिट्स –

अलिकडेच प्रदर्शित झालेली सीरिज म्हणजे ‘बंदिश बँडिट’ . शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीतातलं पिढ्यानपिढ्यांचं द्वंद्व सुरेल आणि सुरेख पद्धतीने रंगवणाऱ्या या वेबमालिकेची निर्मिती अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी केली आहे. तर दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनी या मालिकेच्या निर्मितीसह लेखनाचीही जबाबदारी सांभाळली आहे.