हिंदी चित्रपटाचा ट्रेलर मराठीत सहसा प्रदर्शित केला जात नाही. याआधी शाहरूखने त्याच्या ‘फॅ न’ चित्रपटाचे प्रमोशनल गाणे मराठीत केले होते, मात्र सध्या प्रमोशनचे बदलते वारे पाहता हिंदीचे बडे निर्माते मराठीकडे फार लक्ष ठेवून आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कप्तान म्हणून लौकिक मिळवणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याचा चरित्रपट सर्वदूर पोहोचावा म्हणून तो हिंदीबरोबर तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. धोनीचे चाहते देशभर आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेत या चित्रपटाची माहिती पोहोचावी यासाठी हे खास प्रयत्न केले जात आहेत. तमिळमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्याचा अट्टहास समजू शकतो. कारण नाही म्हटले तरी धोनीने आयपीएलमध्ये आठ वर्षे ‘चेन्नई सुपरकिंग्ज’ टीमचे प्रतिनिधित्व के लेले आहे. मात्र मराठीत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यामागचे प्रयोजन समजू शकलेले नाही.
यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मोठय़ा हिंदी चित्रपटाचा ट्रेलर मराठीत प्रदर्शित होणार हेही नसे थोडके. सुशांत सिंग राजपूतने या चित्रपटात धोनीची भूमिका केली आहे. नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम. एस. धोनी- अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ट्रेलरची तमिळ आवृत्ती दाक्षिणात्य अभिनेता धनुष याच्या हस्ते प्रकाशित होणार आहे, त्यामुळे तिथेही या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठीत हा ट्रेलर कोणाच्या हस्ते प्रकाशित होणार, ही खरी उत्सुकता आहे. नाही म्हटले तरी सचिन तेंडुलकरच्या हस्तेही ट्रेलर प्रकाशित होऊ शकतो, मात्र अजून तरी मराठीत कोणाच्या हस्ते हा शुभारंभ होणार हे गुलदस्त्यात आहे.