शक्तिमान ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकातील मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यावी असे अभिनेते मुकेश खन्ना यांना वाटते. शक्तिमानच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करताना मुकेश म्हणाले की, गेल्या आठवड्यात मी दोन शाळांमध्ये कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे मला मुलांकडून फार प्रेम मिळाले शिवाय मला पाहिल्यानंतर मुलं शक्तिमान नावाने ओरडू लागले होते. त्यामुळे मला वाटते की ही मालिका पुन्हा एकदा टीव्हीवर यावी. दूरदर्शन यासाठी तयारही आहे. पण मला वाटते की याचे प्रसारण सॅटेलाइट चॅनलवर व्हावे. चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएफएसआय) अध्यक्ष मुकेश खन्ना यांनी बाहुबली सिनेमाचे उदाहरण देत सांगितले की, भारतात जिथे एवढ्या बजेटचा एखादा सिनेमा बनतो तिथे मुलांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सिनेमे बनवायला कोणी तयार होत नाही.

निर्मात्यांना नेहमीच असे वाटते की, अशा सिनेमांमधून त्यांचा सिनेमा जास्त कमाई करु शकत नाही. त्यामुळे मनोरंजन करणाऱ्या आणि चित्रपटगृहात जे चांगली कमाई करु शकतात अशा सिनेमांनाही मी यावर्षी परवानगी देणार आहे. तसेच अभीव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. देशविरोधी बोलणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्याच्या नावाखाली जे आपल्या मुलांचे विचार बदलवत आहेत मी अशा लोकांच्या भाषणाचा कडाडून विरोध करतो.

दरम्यान, एकेकाळी दूरदर्शनवर दाखवले जाणारे बालचित्रपट ही आबालवृद्धांसाठी मोठी पर्वणी होती. मात्र मनोरंजन वाहिन्यांच्या वाढत्या फुग्यांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम हरवले. बालचित्रपटांच्या निर्मितीची संख्याही रोडावल्याने लहान मुलांसाठीचे चित्रपट म्हणजे केवळ हॉलीवूडचे अ‍ॅनिमेशनपट एवढाच मर्यादित अर्थ उरला होता. मात्र यापुढे दूरदर्शनवर वर्षभर बालचित्रपट पाहायला मिळणार असल्याची घोषणा ‘चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडिया’चे (सीएफएसआय) अध्यक्ष मुकेश खन्ना यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती.