लहान मुलांबाबत सलमान खानला विशेष आकर्षण आहे हे आपल्याला नेहमीच दिसून येते. त्यांच्यासोबत वेळ घालवणे सलमानला नेहमीच आवडते. आपला आगामी चित्रपट ‘ट्युबलाइट’च्या सेटवरही सलमानला लहान मुलांसोबत खेळताना, बागडताना, मस्ती करताना पाहिलं गेलं. या चित्रपटात बालकलाकार माटिन रे तंगूसुद्धा भूमिका साकारणार आहे. या दोघांमध्ये सेटवर चक्क आईस्क्रीम खाण्याची स्पर्धा रंगली.
शूटिंगदरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत दोघांनीही मिळून २० आईस्क्रीम खाल्ले. माटिनला आईस्क्रीम खूप आवडत असल्याने सेटवर सलमानने आईस्क्रीमचं मशीन लावण्यास सांगितलं होतं. एके दिवशी माटिनने दबंग खानला जास्तीत जास्त आईस्क्रीम खाऊन दाखवण्याचे आव्हान दिले आणि स्पर्धेअखेर दोघांनी मिळून २० आईस्क्रीम खाल्ले. या स्पर्धेचा आनंद सेटवरील इतर कलाकारांनाही घेतला.

सलमानला असलेली लहान मुलांची आवड कुणापासूनही लपून राहिलेली नाही. सलमान धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुलांसोबतही धमाल-मस्ती करतो. दिग्दर्शक कबीर खान आणि इतर निर्मांत्यांची मुले सलमानसोबत लेटेस्ट गेमिंग, अॅप, टेक्निक आणि आवडी-निवडीविषयी गप्पा मारतात. सलमानच्या टीममधील लोक सांगतात, ‘अनेकदा कामात व्यस्त असताना एखादे लहान मुल फोटो काढण्यासाठी आले तर तो सर्व विसरून त्यांची इच्छा पूर्ण करतो. मुलांसोबत गप्पा मारल्यानंतर त्याचा मूड फ्रेश होतो.’

वाचा : रजनीकांतच्या ‘२.०’मध्ये रोबोट बनणार अॅमी जॅक्सन

२५ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ट्युबलाइट’चे चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते ओमपुरी, बालकलाकार माटिन रे तंगू, सोहेल खान यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून, शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल.