‘तुंबाड’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर दिग्दर्शक आनंद गांधी यांच्या आगामी चित्रपटाकडे साऱ्यांचंच लक्ष वेधलं होतं. मात्र आनंद गांधी यावेळी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करत नसून त्यांनी थेट वेब विश्वात पदार्पण केलं आहे. त्यामुळे ‘तुंबाड’नंतर लवकरच त्यांची नवीन वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मेमेसिस’ या त्याच्या आगामी प्रोजेक्टअंतर्गत ते ‘ओके कॉम्प्युटर’ ही नवी वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे ही सीरिज एक विज्ञान-कल्पनारम्य विनोदी मालिका असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘ओके कॉम्प्युटर’ ही एक विज्ञान-कल्पनारम्य विनोदी वेब सीरिज असून ती प्रेक्षकांना समांतर जगाच्या प्रवासावर घेऊन जाईल, जो फारच वेगवान असून यापूर्वी कधीही घडला नसेल, असं या सीरिजविषयी सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ‘शिप ऑफ थिसीएस’ आणि तुंबाड या चित्रपटांमुळे आनंद गांधी हे नाव घराघरात पोहोचलं. विशेष म्हणजे त्यांची लोकप्रियता सातासमुद्रापार पोहोचली आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकण्यापासून ते आतापर्यंत भारताबाहेर सर्वाधिक पाहिली गेलेली डॉक्युमेंटरी म्हणून मान्यता मिळवण्यापर्यंत आनंद गांधींच्या ‘अ‍ॅन्सिग्निफिशंट मॅन’ ने इतिहास रचला आहे.