एफआयआर या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक हे नाव प्रेक्षकांसाठी नवीन नाही. अभिनयासोबतच अनेक वेळा कविता तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत येत असते. अशाच एका ट्विटमुळे कविता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एफआयआर मालिकेचे निर्माते मला अन्य मालिकांमध्ये हरियाणवी पोलिसांची भूमिका करु देत नाहीत, असं वक्तव्य कविताने केलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर छोट्या पडद्यावरही सुरु असल्याचं कविताने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जर मी कोणत्याही मालिकेत हरियाणा पोलिसांची भूमिका साकारली तर मला त्याची किंमत मोजावी लागेस, असं निर्मात्यांनी म्हटल्याचं कविताने ट्विटमध्ये लिहिलं आहे.

“खरं पाहायला गेलं तर हा कार्यक्रम बंद होऊन ५ वर्ष उलटली आहेत. इतकंच नाही तर हा कार्यक्रम पुन्हा सुरु करावा अशी मागणीही प्रेक्षकांमधून करण्यात येत आहे. मात्र गेल्या पाच वर्षात हा कार्यक्रम पुन्हा सुरु झाला नाही आणि तुम्ही मुव्ही माफियांबद्दल बोलताय. व्वा”, असं ट्विट कविताने केलं आहे.

तसंच “अन्य कोणत्याही मालिकेत मला हरियाणा पोलिसांची भूमिका करु नकोस”, असं वारंवार सांगण्यात येत आहे. ‘एफआयआर’ या कार्यक्रमाच्या भूमिकेतून चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेत कविता कौशिक घराघरामध्ये पोहचली. या शोमधील प्रत्येक व्यक्ती विनोदाचं अचुक टायमिंग, उत्तम अभिनय यामुळे लोकप्रिय झाली आहे.