छोट्या पडद्यावर तुफान गाजलेल्या इंडियाज बेस्ट डान्सर या रिअॅलिटी शोला त्यांचा विजेता मिळाला आहे. हरियाणाचा अजय सिंहने यंदाच्या पर्वाचा विजेता होण्याचा मान पटकावला असून सध्या त्याच्या डान्सची आणि त्याला मिळालेल्या बक्षीसाच्या रक्कमेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे अजय सिंहने यंदाचं इंडियाज बेस्ट डान्सरचं पर्व गाजवलं. त्याच्या डान्स करण्याच्या अनोख्या शैलीमुळे त्याने प्रेक्षक आणि परीक्षकांचं मन जिंकण्यास यश मिळवलं. त्यांमुळे यंदाचं पर्व गाजवल्यानंतर त्याच्याविषयीच्या विविध चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. यामध्येच अजयला बक्षिसाच्या रुपात नेमकी किती रक्कम मिळाली हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

‘इंडियाज बेस्ट डान्स’चं विजेतेपद पटकावणाऱ्या अजयला १५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत. तर त्याला मार्गदर्शन करणारी नृत्यदिग्दर्शिका वर्तिका झा हिला ५ लाख रुपये देण्यात आले आहेत.

वाचा : नेहाच्या लग्नाला एक महिना पूर्ण; शेअर केला रोहनप्रीतसोबतचा ‘हा’ रोमॅण्टीक व्हिडीओ

दरम्यान, रविवारी संध्याकाळी इंडियाज बेस्ट डान्सरचा महाअंतिम सोहळा रंगला. यात अजय सिंह, मुकुल गॅन, श्वेता वॉरिअर, परमदीप सिंह आणि शुभ्रनील पॉल हे शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. यापैकी अजय सिंह विजेता झाला असून मुकुल फर्स्ट रनर अप व श्वेता दुसरी रनरअप ठरली.