बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेतले बिऱ्हाड गुंडाळून माधुरी दीक्षित-नेने भारतात परतली. आणि तिने एकाचवेळी छोटय़ा आणि मोठय़ा पडद्यावरचे काम सुरू केले. मात्र, पुनरागमनानंतर मोठय़ा पडद्यावरच्या दोन्ही चित्रपटांमधून माधुरीला फारसे यश मिळाले नसले तरी छोटय़ा पडद्यावर ‘झलक दिखला जा’ची परीक्षक म्हणून ती कायम चर्चेत राहिली आहे. आताही ‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वासाठी पहिल्यांदाच  पाश्चिमात्य नृत्यप्रकार शिकणाऱ्या माधुरीने यावेळची आपली छोटय़ा पडद्यावरची ‘झलक’ दमदार असेल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. छोटय़ा पडद्यावर मिळणाऱ्या या अमाप लोकप्रियतेमुळेच असेल पण, आजच्या काळात टीव्ही हे चित्रपटक्षेत्रातली कलाकारांसाठी उत्तम पर्यायी माध्यम होऊ शकते. त्यामुळे कलाकारांना माध्यमाचे बंधन असू नये, असे मत माधुरीने ‘रविवार वृत्तांत’कडे व्यक्त केले.
एकेकाळी मोठा पडदा व्यापून टाकणारी माधुरी तिच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यावर छोटय़ा पडदा गाजवू लागली. ‘झलक दिखला जा’ सारख्या नृत्याशी निगडीत शोमुळे माधुरीला तिच्या अदाकारीला पुन्हा वाव मिळाला आणि प्रेक्षकही ‘मोहिनी’ च्या या अदांनी पुन्हा घायाळ झाले. या कार्यक्रमाच्या तिन्ही पर्वाना तिने आपल्या हजेरीने चारचाँद लावले होते. माधुरीचे ‘झलक’मध्ये असणे म्हणजे केवळ नृत्याची पर्वणी नसते. तर एकेकाळचे तिचे समकालीन कलाकार जेव्हा ‘झलक’च्या सेटवर येतात तेव्हा त्यांच्याशी होणारा तिचा संवाद, रेमो आणि करण यांच्याबरोबरची धम्माल अशा सगळ्या गोष्टी प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आणि हे माधुरीही मान्य करते. ‘झलक दिखला जा’ हा माझ्यासाठी पूर्णपणे एक वेगळा अनुभव आहे. यात मला स्वत:ला विविध प्रकारचे नृत्यप्रकार पहायला मिळतात, वेगवेगळी लोकं भेटतात. शिवाय, रेमो-करण आणि मी खूप मजा करत असतो. यावेळच्या पर्वासाठी मी फार मेहनत केली आहे. पाश्चिमात्य अवतारात त्यांचेच वेगवेगळे नृत्यप्रकार मी पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर करणार आहे. म्हणजे याआधी मला लोकांनी घागरा, साडय़ांमध्ये पाहिले आहे. आता मी पूर्णपणे वेगळी दिसणार आहे. आणि मी सालसा, टँगोसारखे नृत्यप्रकार शिकून ते करण्याचा प्रयत्न केला आहे, असे माधुरी उत्साहाने सांगते. आजच्या काळात कलाकाराने कोणत्याही विशिष्ट माध्यमात अडकून पडू नये. तर त्याच्या कलेशी प्रामाणिक राहत मिळेल त्या माध्यमाचे सोने केले पाहिजे, असे मतही माधुरीने यानिमित्ताने व्यक्त केले.
तुम्ही चित्रपटात झळकलात म्हणजे स्टारपद मिळतं ही धारणा आता हळूहळू बदलू लागली आहे. टीव्ही हे खूप सुंदर माध्यम आहे. तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही टीव्हीवर नक्कीच काम करू शकता. येथे तुम्ही दरदिवशी काहीतरी नवीन शिकत असता. सध्या भरपूर वाहिन्या असल्यामुळे निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळू लागले आहे. आणि माझ्यासाठी माझ्या चाहत्यांशी भेटण्याचे टीव्ही हे एक नवे साधन बनले आहे. मी माझ्या नृत्यावरील प्रेमामुळे टीव्हीशी जोडली गेले आणि याच टीव्हीने माझी पूर्वीपेक्षा जास्त मोठय़ा प्रेक्षकवर्गाशी ओळख करून दिली. यात अगदी लहान मुलांपासून विविध वयोगटातील प्रेक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे या माध्यमाने मला भुरळ घातली आहे