छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांचं आयुष्य अत्यंत सुंदररित्या रेखाटण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही मालिका यशस्वी करण्यासाठी त्यातील कलाकारांचा मोठा मोलाचा वाटा आहे. यात जेठालाल आणि दयाबेन या दोन पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य मिळवलं आहे. दयाबेन हा पात्र दिशा वकानी हिने साकारलं आहे. तर जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांनी वठविली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दिलीप जोशी सातत्याने चर्चेत येत असून आता त्यांनी वेब सीरिजमधील बोल्ड आणि अर्वाच्च भाषेतील संवादावर संताप व्यक्त केला आहे. सौरभ पंत यांच्या युट्यूब पॉडकास्टमध्ये ते बोलत होते.

सध्याचा काळ हा वेब सीरिजचा असून तरुणाईला आकर्षित करणारे विषय या सीरिजमध्ये हाताळले जात असल्याचं दिसून येतं. मात्र, अनेकदा या सीरिजमध्ये बोल्ड आणि अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात येतो. त्यावरच दिलीप जोशी यांनी संताप व्यक्त केला आहे.

“ओटीटीवर अनेकदा चांगले विषय हाताळले जातात, उत्तम कलाकारही असतात. मात्र, बऱ्याच वेळा या सीरिजमध्ये शिवीगाळ किंवा अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात येतो हे चुकीचं आहे. खरं तर या सगळ्याची काहीच आवश्यकता नसते. तुम्ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करता. पण तुम्ही नेमकं काय दाखवता यावर सगळं आधारित आहे. कारण आपण जे सादर करतो ते कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलं जातं. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने अपशब्दांचा वापर करावा अशी तुमची इच्छा आहे का? प्रत्येक गोष्टीची एक सीमा, मर्यादा असते. त्यामुळे त्या चौकटीत राहून काम केलं तरच ते काम करण्याची मज्जा आहे. पण, जर तुम्ही ती चौकट मोडून काम करत असला तर पुढे त्यावरुन तुम्हालाच संकटांचा सामना करावा लागेल”, असं दिलीप जोशी म्हणाले.

आणखी वाचा- “एका भागासाठी मिळायचे ५० रुपये”; ‘जेठालाल’नं सांगितली आपली संघर्ष कथा

पुढे ते म्हणतात, “मला मान्य आहे की बदल घडवण्यासाठी वेळ लागतो. पण जे पाश्चिमात्य संस्कृतीत केलं जातं तेच आपण आपल्या इथे करण्याचा प्रयत्न करतोय.पण आपली संस्कृती आणि सभ्यता अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. पण आपण त्याकडे लक्ष न देता पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत. त्यांच्याकडे आई-वडिलांवरुन अर्वाच्च भाषेत बोलणं चालतं, पण आपल्याकडे तसं नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी याच पद्धतीने बोलू शकता?”

आणखी वाचा- ‘आमच्या भावनांशी खेळू नकोस’; दया बेनच्या ‘त्या’ फोटोंवर चाहते संतापले

दरम्यान, या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी त्यांच्या तारक मेहता का उलटा चष्माविषयीदेखील अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसंच जेव्हा तुम्ही कॉन्टीटीचा विचार करता तेव्हा तुमची क्वालिटी घसरते असंही त्यांनी सांगितलं.