13 December 2017

News Flash

TVF molestation row: ‘बेडरुममध्ये महिलांना ‘सेक्सी’ म्हणणं स्वीकारार्ह; पण…’

तिला बळजबरीने स्पर्श करु नका

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 20, 2017 1:28 PM

ट्विंकल खन्ना

‘द व्हायरल फिवर’ या वेबचॅनेलचा सीईओ अरुणभ कुमार याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपांवरून आता सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. अभिनेत्री, लेखिका ट्विंकल खन्नाने तिच्या लेखणीद्वारे पुन्हा एकदा ठामपणे तिचे विचार व्यक्त करत अनेकांचेच लक्ष वेधले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या एका सदरामध्ये ट्विंकलने तिचे विचार मांडले आहेत. नोकरदार वर्गातील महिलेसाठी ‘सेक्सी’ या शब्दाचा वापर ती ‘बोल्ड’ असेल तरच स्वीकारार्ह असतो, असे ट्विंकलने म्हटले आहे.

टिव्हीएफ म्हणजेच ‘द व्हायरल फिव्हर’च्या अरुणभ कुमारवर निशाणा साधत टविंकलने तीव्र शब्दांत तिचे मत मांडले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांची छेड काढणाऱ्या वरिष्ठांना उद्देशून ट्विंकलने लिहिले आहे की, अशा लोकांनी बार, क्लब, टिंडर डेटिंग अॅप किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नसमारंभामध्ये लक्ष घालावे आणि कामाच्या ठिकाणी महिलांना नीट काम करु द्यावे. त्यासोबतच ट्विंकलने असेही लिहिलेय, ‘जर का तुम्ही मद्यपानासाठी कोणा एका महिला सहकाऱ्याला तुमच्यासोबत नेऊ इच्छिता, तर त्या महिलेचा आदर करतच तिला अशा गोष्टींची विचारणा करा. जर का तिची काही हरकत असेल तर तिला एकटे राहू द्या. तिच्या स्वातंत्र्याचा आदर करा ‘

‘महिला कर्मचाऱ्यांकडे चुकीच्या नजरेने पाहू नका, त्यांचा पाठलाग करु नका, तिला बळजबरीने स्पर्श करु नका आणि अश्लील संदेश तर पाठवूच नका. कारण, फक्त बेडरुममध्येच महिलेला ‘सेक्सी’ म्हणणं योग्य आहे. सार्वजनिक ठिकाणी नाही’, असेही ट्विंकलने तिच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. अर्थात ट्विंकलच्या शब्दांचे बाण थेट अरुणभला लागलेच असणार यात शंका नाही. अरुणभवर निशाणा साधतानाच ट्विंकलने तिच्यासोबत घडलेल्या छेडछाडीच्या प्रकारावरुनही पडदा उचलला. आज जवळपास ३८% महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो, असे म्हणत ट्विंकलने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. तिच्या या ठाम मतांमुळे अभिनेता अक्षय कुमारनेही ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विंकलची पाठराखण केली आहे.

‘द व्हायरल फिव्हर’ या ऑनलाइन एन्टरटेनमेंट चॅनेलच्या माजी कर्मचारी महिलेने रविवारी ब्लॉगच्या माध्यमातून चॅनेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक अरुणभवर विनयभंगाचा आरोप केला होता. दोन वर्षे ‘द व्हायरल फिव्हर’मध्ये काम करत असताना अरुणभने वारंवार विनयभंग केल्याचे या महिलेने म्हटले होते. ‘द इंडियन उबर-दॅट इज टिव्हीएफ’ या ब्लॉगवर ‘इंडियन फॉलर’ नावाने या महिलेने स्वत:ची व्यथा मांडली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी असेलल्या अरुणभ कुमारकडून वारंवार करण्यात आलेल्या विनयभंगाचा उल्लेख या ब्लॉगमध्ये करण्यात आला होता. टिव्हीएफने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले.

 

First Published on March 20, 2017 1:05 pm

Web Title: twinkle khanna reacts on tvf row sexy is acceptable