“भारत हा असा देश आहे जिथे गायी विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. तुम्ही हिंसेचा वापर करुन लोकांना दडपून ठेऊ शकत नाही,” असा इशाराच अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नाने सरकारी यंत्रणांना दिला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तिने ट्विटवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय घडलं?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष यांच्याबरोबर २० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

ट्विंकलने व्यक्त केला संताप

याच प्रकरणावरुन ट्विंकल खन्नाने एका वृत्तपत्राचा फोटो ट्विट करत निषेध व्यक्त करण्याबरोबरच सरकारी यंत्रणांना इशाराही दिला आहे. ट्विंकलने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक वृत्तपत्र दिसत आहे. या वृत्तपत्रामध्ये जेएनयूमधील हल्ल्याची बातमी आहे. यात लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोर दिसत असून बातमीचा मथळा, “ते इथेच आहेत काल एएमयू, आज जेएनयू आणि उद्या यू (तुम्ही)” असा आहे. याच पहिल्या पानाचा फोटो शेअर करत ट्विंकलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारत हा असा देश आहे जिथे गाई विद्यार्थ्यांपेक्षा अधिक सुरक्षित आहेत. मात्र आता हा देश झुकण्यासाठी तयार नाही. तुम्ही हिंसेचा वापर करुन लोकांना दडपून ठेऊ शकत नाही. असं केल्यास अनेक आंदोलनं, बंद होतील आणि अधिक लोकं रस्त्यावर उतरतील. हेच या मथळ्यामधून दिसत आहे,” असं ट्विंकलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काही तासांमध्ये सात हजारहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. अनेकांनी ट्विंकलने उघडपणे अशाप्रकारे या हल्ल्याचा निषेध नोंदवल्याबद्दल तिचे कौतुक केलं आहे.