उडता पंजाब चित्रपटावरून बुधवारी बॉलिवूड विरूद्ध सेन्सॉर बोर्ड असे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सॉर बोर्डने चित्रपटामध्ये सुचवलेल्या ८९ कट्सचा विरोध करण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार यांच्यासह बॉलिवूडमधील इतर निर्माते, दिग्दर्शकांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यप याने सेन्सॉर बोर्डाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या चित्रपटाचे समर्थन करण्यासाठी अशा प्रकारे पत्रकार परिषद घ्यावी लागते, हे आमच्यासाठी दुर्दैवी असल्याचे त्याने म्हटले आहे. दुसरीकडे आपण केवळ सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष म्हणून आपले काम केले. हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित करू नये, असे मी म्हटलेच नव्हते, असे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी म्हटले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली.
पत्रकार परिषदेत चित्रपट निर्माते मुकेश भट म्हणाले, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होण्याची पहलाज निहलानी यांची पात्रताच नाही. त्यामुळे त्यांना तातडीने त्या पदावरून दूर करावे, अशी मागणी मी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे करतो आहे.
गेल्या दोन वर्षांत असे काय घडले की प्रत्येक चित्रपटाला न्यायालयात जाऊन प्रदर्शनाची परवानगी घ्यावी लागते आहे, असा प्रश्न यावेळी अनुराग कश्यप याने उपस्थित केला.
या चित्रपटातून जो संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे, असे या चित्रपटातील अभिनेता शाहीद कपूरने यावेळी सांगितले.