प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सरकारी बाजू मांडणारे वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित लवकरच बायोपिक येणार आहे. ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या बायोपिकच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील कधीही न पाहिलेली बाजू समोर येणार आहे.
उज्ज्वल निकम यांनी आजवर अनेक महत्त्वाचे खटले लढले असून त्यात यशही मिळवलं आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय उमेश शुक्ला यांनी घेतला आहे. या चित्रपटाचं नाव ‘निकम’ असं असून चित्रपटाच्या कथेचं लेखन भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला करणार आहेत.
“गेल्या कित्येक वर्षांपासून मी एखादं पुस्तक लिहावं किंवा माझा बायोपिक यावा अशी काहींची मागणी आहे. परंतु मला हे मान्य नाही. माझ्यावर बायोपिक यावा अशी माझी इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझ्यावर अनेक खटल्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. परंतु माझ्याकडे या चित्रपटाची टीम आली आणि त्यांची संकल्पना मला पटली. कदाचित या चित्रपटातून अशी एखादी कथा प्रेक्षकांसमोर सादर होईल की ज्यातून लोक प्रेरणा घेतील. त्यामुळे या बायोपिकसाठी मी तयार झालो”, असं उज्ज्वल निकम यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
“आम्ही अशा एका व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट तयार करत आहोत ज्यातून प्रेरणा मिळेल. हिरो फक्त स्टाइल करणारेच असतात असं नाही. तर काही हिरो हे खऱ्या आयुष्यात असतात. तसेच उज्ज्वल निकम आहेत”, असं उमेश शुक्ला म्हणाले. उज्ज्वल निकम यांनी दहशतवादी अजमल कसाब , कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरण,मोहसिन हत्या प्रकरण,प्रमोद महाजन हत्या प्रकरण हे खटले लढले आहेत. तर उमेश शुक्ला यांनी ‘ओह माय गॉड’, ‘102 नॉट आऊट’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 8, 2020 2:20 pm