‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या दोन वेगळ्या विषयांवरील चित्रपटांनंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुंतरू’ हा नवा मराठी चित्रपट येत्या ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘फुंतरू’ हा मराठी चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. मराठीत आजवर कधीही आला नाही असा विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित विषय या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाके यांच्याशी केलेली बातचीत तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकारांची जोडी केतकी माटेगावकर व मदन देवधर यांचे मनोगत..

गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटातून वेगवेगळे विषय हाताळले जात असून तरुण निर्माते व दिग्दर्शकांच्या या प्रयत्नाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या सगळ्यांवर झाला असून विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या प्रगतीत मानवी नातेसंबंध आणि कुटुंबातील संवाद हरवत चालला आहे. काही अपवाद वगळता मराठी चित्रपटातून बदलत्या सामाजिक जीवनशैलीचे प्रत्यंतर फारसे दिसून आले नाही. विज्ञान-तंत्रज्ञान हा विषय तर मराठीत आजवर आलेलाच नाही. येत्या ११ मार्च रोजी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा ‘फुंतरू’ हा चित्रपट मराठीतील पहिला विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असलेला चित्रपट ठरणार आहे. चित्रपटात प्रेमकथा असली तरी ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती आणि त्याचा मानवी भावभावना व नातेसंबधांवर झालेला परिणाम या स्वरूपात सादर करण्यात आली आहे.

‘शाळा’ आणि ‘आजोबा’ या दोन वेगळ्या विषयांवरील चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सुजय डहाके हेच ‘फुंतरू’चे दिग्दर्शक आहेत. त्यांच्याशी गप्पाची सुरुवात चित्रपटाच्या वेगळ्या धाटणीच्या नावावरून झाली. ‘फुंतरू’ म्हणजे नेमके काय हे स्पष्ट करताना डहाके म्हणाले, ‘फुंतरू’ म्हणजे ‘गॅजेट’ किंवा ‘उपकरण’. या ‘गॅजेट’च्या साहाय्याने आपण काही तरी उघडून पाहात असतो. आत्ताच्या पिढीला स्मार्ट भ्रमणध्वनीमुळे ‘गॅजेट’ म्हणजे काय हे वेगळे सांगायला नको. चित्रपटाचे नाव वेगळे असावे आणि त्या नावामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊन त्यांनी चित्रपटगृहापर्यंत यावे हा हे नाव देण्यामागचा उद्देश आहे. मी दिग्दर्शित केलेला ‘आजोबा’ हा चित्रपट विज्ञान-पर्यावरण विषयाशी संबंधित होता. त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खरे तर तेथेच ‘फुंतरू’चा पाया रचला गेला. या विषयाचा सखोल अभ्यास करून विज्ञानविषयक चित्रपट असावा या दृष्टीने कथेची शोधाशोध सुरू झाली आणि ‘फुंतरू’ उलगडत गेला.

चित्रपटाच्या कथेबाबत आणि अन्य तपशिलाबाबत गुप्तता राखत सुजय म्हणाले, गेली दोन वर्षे यावर काम सुरू होते. हा चित्रपट पूर्णपणे तरुणांचा आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची ही कथा आहे. त्यांचे भावविश्व आजवर मराठी चित्रपटात आले नव्हते. या विद्यार्थ्यांचे जीवन, त्यांच्यातील स्पर्धा, संघर्ष आणि एखादी गोष्ट मिळविण्यासाठी विशिष्ट थराला जाणे असे सर्व काही यात आहे. प्रेमाभोवती फिरणाऱ्या या कथेत अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची प्रेमकथा आहे. या मुलाच्या आयुष्यात एक मुलगी येते. तो तिच्या प्रेमात पडतो. पण ती त्याला नकार देते आणि यातून ‘फुंतरू’चा जन्म होतो. केतकी माटेगावकर यात दोन भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. आता ती नेमके कशी ते प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यात मजा येईल. चित्रपटात चार गाणी असून ती कोणाच्याही तोंडी नाहीत हे विशेष. चित्रपट पुढे सरकताना ती पाश्र्वभूमीवर ऐकायला मिळतील, अशीच त्यांची रचना केलेली आहे.

चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, श्रीरंग देशमुख, आरती सोळंकी, केतकी माटेगावकर, मदन देवधर यांच्यासह शिवराज वायचळ, शिवानी रांगोळे, ऋतुराज शिंदे, रोहित निकम आदी कलाकार आहेत. केतकी माटेगावकर ही या चित्रपटात तिच्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या ‘लूक’मध्ये दिसणार आहे. चित्रपट तयार करताना समोर कोणताही संदर्भ नव्हता. त्यामुळे वेळोवेळी डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर आदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तसेच विज्ञान साहित्य लेखक यांच्याबरोबर चर्चा करून चित्रपट पूर्णत्वास नेला आहे. चित्रपटाची कथा जिथे संपते तिथून ‘फुंतरू’-२ किंवा ३ तयार होऊ शकत असल्याचेही डहाके यांनी सांगितले.

हा चित्रपट विद्यार्थी आणि तरुणांमध्ये विज्ञानविषयक आवड निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. विज्ञान या विषयाला महत्त्व यावे, असा माझा ध्यास आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन काही तरी घडवावे, यात संशोधन आणि विकास करावा असे मला वाटते. त्यासाठी ‘फुंतरू’ चित्रपटाची नक्कीच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून डहाके म्हणाले, चित्रपटाच्या मध्यंतरानंतरचा भाग हा प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देईल. मराठीत पहिल्यांदा ‘व्हीएफएक्स’ तंत्रज्ञानाचा आणि ग्राफिक्सचा वापर करण्यात आला आहे. ‘फॅ ण्टसी’ हा प्रकार यात पाहायला मिळेल. चित्रपटातील आत्ताची कल्पना भविष्यकाळातील वास्तव असू शकते, असा इशाराही जाता जाता दिग्दर्शकाने दिला आहे.

‘माझा मेकओव्हरच’

‘शाळा’, ‘काकस्पर्श’, टाइमपास’-१ आणि २ या चित्रपटांतून प्रेक्षकांनी मला बाळबोध भूमिकेत आणि वेशभूषेत पाहिले आहे. ‘फुंतरू’ हा चित्रपट म्हणजे माझा पूर्णपणे मेकओव्हर आहे. आत्तापर्यंत मी चित्रपटातून जशी भूमिका वठवली त्याच पद्धतीच्या किंवा ठरावीक साच्यातील अशा भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या. वेगळी भूमिका करायची खूप इच्छा होती, पण मला कोणी विचारलेच नाही. सुजय डहाके यांनी मला ‘फुंतरू’च्या निमित्ताने तशी संधी दिली. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी केतकी प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे. माझे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदललेले यात दिसेल. चित्रपटातील भूमिकेसाठी मी अमुक प्रकारे दिसावे, असे अपेक्षित होते. त्यामुळे चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी मी व्यायामशाळेत जाऊन व्यायामाचे धडेही गिरविले आणि वजन वाढविले आहे. आत्ताच्या तरुण पिढीचे भावविश्व, त्यांचे बोलणे, त्यांची वेशभूषा हे सगळे ‘फुंतरू’मध्ये मी साकारले आहे. वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली तर एक आव्हान म्हणून मी ती स्वीकारेन. हा चित्रपट विज्ञान-तंत्रज्ञानावर आधारित असला तरी तो कुठेही बोजड किंवा कंटाळवाणा होणार नाही, याची काळजी घेतली आहे. ‘विज्ञान’ हा मूळ पाया ठेवून हिंदीत जसा ‘थ्री इडियट’ आला तसाच ‘फुंतरू’ प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

केतकी माटेगावकर

‘युवा पिढीचे प्रतिनिधित्व’ 

‘फुंतरू’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटात मी ‘सॉफ्टवेअर’ अभियंत्याची भूमिका करतो आहे. माझी ही भूमिका आत्ताच्या युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आहे. माणूस आणि विज्ञान-तंत्रज्ञान यांच्यात एक नाते आहे. आज माणसाने आपल्या आयुष्यातील खूप मोठी जागा या तंत्रज्ञानाला दिलेली आहे. मानव आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या या नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. हे नाते पुढे कसे न्यायचे ते माणसावरच अवलंबून आहे. ‘फुंतरू’च्या निमित्ताने हे नातेसंबंध उलगडले जाणार आहेत.

मदन देवधर