|| देविका जोशी

आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देणारा अभिनेता उपेंद्र लिमये लवकरच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जोगवा’, ‘यलो’, ‘मुळशी पॅटर्न’ अशा विविध चित्रपटांमधून त्याने कायमच आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या मालिका-चित्रपटांतून गायब असलेला उपेंद्र हिंदी टेलिव्हिजन सृष्टीत पदार्पण करतो आहे. तो या मालिकेत पहिल्यांदाच कथ्थक शिक्षकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘तारा फ्रॉम सातारा’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेतून बाप-मुलीच्या नात्याचा ओलावाही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

आतापर्यंत ‘यलो’, ‘सूर सपाट’ या चित्रपटांमधून उपेंद्रने प्रशिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. दर चित्रपटागणिक वेगळ्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणारा उपेंद्र इथेही नव्या अवतारातच दिसणार आहे. ‘प्रत्येक भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास करतोच. या भूमिकेसाठी कथ्थकची शैली मला आत्मसात करायची होती. मला कथ्थकचे बोल, देहयष्टी, हालचाली या काटेकोरपणे शिकायच्या होत्या. मी लहानपणापासून पुण्यात वाढलोय, त्यामुळे शास्त्रीय संगीत, कथ्थक नृत्य अशा गोष्टींशी काही ना काही संबंध आलाच होता. ‘ललित कला केंद्रा’त शिकत असताना माझ्यासोबतचे अनेकजण शास्त्रीय संगीत, नृत्य शिकलेले होते. मी त्यांचे कार्यक्रम बघायचो, पण कधी त्याचा अभ्यास केला नव्हता. ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त अनेक कला बघण्याचा योग यायचा. या भूमिकेच्या निमित्ताने मी माझ्या मित्रांशी संपर्क साधून कथ्थकशी निगडित अनेक गोष्टी शिकलो’, अशी माहिती उपेंद्रने दिली.

कथ्थक शिक्षकाची भूमिका ही एखाद्या नटासाठी तितकी सोपी नाही. त्यासाठी खरोखरच त्याचे काहीएक ज्ञान असणे गरजेचे आहे. अशा वेळी या भूमिकेसाठी नेमकी कशी तयारी केलीस?, असं उपेंद्रला विचारल्यानंतर तो म्हणाला की, ‘मी कॉलेजमध्ये असताना ड्रमर होतो, त्यामुळे तालाचं मला थोडंफार ज्ञान होतं. हल्ली  इंटरनेटमुळे संवाद साधणं खूप सोप्पं झालंय. मी माझ्या कथ्थक शिकलेल्या मैत्रिणीशी व्हिडीओ कॉल किंवा व्हॉइस मेसेजवर कथ्थकचे बोल शिकतोय. माझी एक मैत्रीण व्हायोलिन प्रशिक्षक आहे, पोलंडला राहणारी दुसरी एक मैत्रीण आहे जी प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. तिच्याकडून व्हिडीओजच्या माध्यमातून मी धडे घेतो आहे. या सगळ्यांशी ऑनलाइन बोलून मी सध्या कथ्थकचं शिक्षण घेतो आहे. शिवाय, सेटवरही मला अजित पाटील शास्त्रीय नृत्याचे काही मूलभूत हावभाव, स्टेप्स यांचे प्रशिक्षण देत आहेत’, असं त्याने सांगितलं.

हिंदीतील मालिकेत काम करण्यामागे या मालिकेचे वेगळेपण असल्याचेही त्याने स्पष्ट केले. या मालिकेत रिअ‍ॅलिटी शो आणि दैनंदिन कथानक यांचा मिलाफ अनुभवता येणार आहे. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांची संपूर्ण टीम आपल्या मदतीला असते, असं तो म्हणतो.  खरंतर टीव्हीपासून कायमच तसा दूरदूर राहिलेला उपेंद्र गेली काही वर्षे सातत्याने मालिकांमध्ये दिसून आला आहे. २००८ ते २०१६ दरम्यानच्या काळात तो छोटय़ा पडद्यापासून लांब राहिला होता. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकुशी’ मालिकेतून तो प्रेक्षकांसमोर आला होता. आता या मालिकेनंतरही  बऱ्याच काळाने तो पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. ‘मालिकांमधला साचेबद्धपणा मला आवडत नाही. पण, या माध्यमाची ताकद प्रचंड आहे. संहिता उत्तम असेल तर मालिका करायला मला नक्कीच आवडतं. या मालिकेचं कथानक प्रत्येकाला आपलंसं वाटेल असं आहे. संहिता भक्कम असेल तरच तुमची व्यक्तिरेखासुद्धा उठून दिसते’, असं सांगणाऱ्या उपेंद्रने या मालिकेतील नृत्य प्रशिक्षकाच्या माध्यमातून कथ्थक नृत्यामागची भावना लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न क रणार असल्याचेही स्पष्ट केले.

या मालिकेबरोबरच उपेंद्र लवकरच अरविंद जगताप लिखित एका चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर हिंदीमध्येही तो दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करतो आहे. त्याबद्दलचा अनुभव सांगताना, ‘अनुरागबरोबर काम करताना मला प्रायोगिक रंगभूमीचे दिवस आठवले. खूप दिवसांनी नाटक करणारं कोणीतरी भेटलं याचा आनंद आहे. आपण मनापासून काम केलं तर आपल्या कामाची दखल घेतली जातेच यावर माझा ठाम विश्वास आहे’, असंही उपेंद्र म्हणाला.

चौकटीबद्ध-अतिरेकी कथानक, बटबटीतपणा यामुळे टेलिव्हिजन माध्यमाकडे वाईट दृष्टिकोनातून बघितलं जातं. पण, जेव्हा तुम्ही ठरावीक भूमिकांच्या बाहेर जाऊ न एका वेगळ्या भूमिकेवर काम करता तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही समृद्ध होता. या भूमिकेचे वर्णन ऐकल्यानंतर मी लगेचच होकार कळवला, कारण या भूमिकेत कलाकार म्हणून मला अधिक समृद्ध बनवण्याची ताकद आहे.      – उपेंद्र लिमये